आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्वद वर्षांच्या ‘मिरासदारी’चा शिवशाहीरांकडून गाैरव; जावडेकरांनी उलगडल्या अाठवणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘प्रा. द. मा. मिरासदार यांचे कॉलेजमधील तास म्हणजे आनंदपर्व असायचे. सरांचे वर्ग कायम हाऊसफुल्ल असायचे. आज मी देशाचा शिक्षणमंत्री या नात्याने नव्हे तर सरांचा विद्यार्थी म्हणून त्यांना अभिवादन करायला आलो आहे,’ अशा शब्दांत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार प्रा. द. मा. मिरासदार यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. निमित्त होते द. मा. ऊर्फ दादांच्या नव्वदीनिमित्त आयोजित सत्काराचे.   

पंढरीच्या विठोबाची पगडी, तुळशीहार घालून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते मिरासदारांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जावडेकर यांच्यासह महापौर मुक्ता टिळक, मिरासदार दादांच्या कन्या सुनेत्रा मंकणी, उद्योगपती कृष्णकुमार गोयल, हरिभाऊ मिरासदार आदी उपस्थित होते. 

पुरंदरे म्हणाले, ‘दादांच्या निखळ, निर्मळ आणि निर्व्याज विनोदामुळे महाराष्ट्र हसत राहिला. त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय खेळकर आहे. कुणालाही न दुखावता ते विसंगती टिपत राहिले. जखम होईल, असे त्यांनी लिहिले नाही. त्यांचा विनोद हे आयुष्याचे अमृत आहे. वाचकांनाही त्यांनी खेळकरपणा शिकवला. विनोदात मोठा आनंद लपला आहे, हे त्यांनी दाखवून दिले.’ ‘वाणी आणि लेखणीवर दादांचे सारखेच प्रभुत्व आहे. सर्जनशीलतेचा आणि संवेदनशीलतेचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे,’ असे प्रा. मिलिंद जोशी म्हणाले.    

दु:ख विसरायला लावण्याची ताकद विनोदात : द.मा.  
मिरासदार म्हणाले, ‘मी विनोदी लेखन केले कारण विनोद हा माझ्या स्वभावाचाच भाग होता, आहे. मानवी जीवनात दु:ख खूप असते. त्यापासून कुणाचीही सुटका नाही. विनोद दु:ख नाहीसे करत नाही, पण दु:ख विसरायला लावण्याची ताकद विनोदात असते. मी शिक्षक, प्राध्यापक, वक्ता, कथाकथनकार. बोलणे हा माझा पेशा, पण आज माझ्यावरच्या प्रेमापोटी जमलेले तुम्ही सारे पाहून मला बोलायला सुचत नाही.’  

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...