आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: सर्वसमावेशक शिक्षणाला पूरक ‘एकांश’चा उपक्रम; मुलांना सक्षम बनवण्याचे प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- को एज्युकेशनची संकल्पना (सहशिक्षण) आपल्याकडे बरीच रुळली आहे. मात्र, गतिमंद आणि विशिष्ट शारीरिक विकलांगता असणाऱ्या मुलांनाही सर्वसामान्य मुलांसोबत शिकण्याची संधी सहसा मिळत नाही. विकलांग तसेच गतिमंद मुलांसाठी स्वतंत्र शाळा असतात. मात्र, आपल्या देशात अशा शाळांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुले गतिमंद किंवा विशेष मुलांच्या बाबतीत असंवेदनशील राहतात आणि पुढेही विशेष मुलांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित राहतो. तसेच विशेष मुलांना सहशिक्षणाची संधीही नाकारली जाते. या सामाजिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर ‘एकांश ट्रस्ट’ने ‘वेगळेपणाचा उत्सव’ या शीर्षकांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी गोष्टींचे आगळेवेगळे पुस्तक प्रकाशित केले आहे. अपंगत्व या विषयाबद्दल सर्वसामान्य मुले विद्यार्थी दशेपासून अधिक संवेदनशील आणि सुजाण व्हावीत ही अपेक्षा पूर्ण करणाऱ्या गोष्टी या पुस्तकात आहेत.    

शारीरिक अपंगत्व असणाऱ्या मुलांना सक्षम बनवण्यासाठी ‘एकांश ट्रस्ट’च्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. सर्वसमावेशक शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. अधिकाधिक शाळांनी यापुढे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत विकलांगता असणाऱ्या विशेष मुलांनाही सामावून घेणे गरजेचे आहे. काही शाळा तसा प्रयत्न करतही आहेत. गतिमंद आणि विकलांग मुले आणि त्यांची विकलांगता याविषयी सर्वच मुलांना संवेदनशील बनवणे समाजाच्या दृष्टीनेही आवश्यक आहे या भावनेतून ट्रस्टतर्फे ‘वेगळेपणाचा उत्सव’ हे गोष्टींचे पुस्तक तयार केले आहे, अशी माहिती ट्रस्टच्या वरिष्ठ समन्वयक अपर्णा मोडक यांनी दिली.    

मुले सुजाण होतील  
‘वेगळेपणाचा उत्सव’ या संग्रहातील गोष्टी सामान्य विद्यार्थ्यांना विशेष मुलांना जाणून घेण्यासाठी, त्यांचा वेगळेपणा समजून घेण्यासाठी व त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी मदत करतील. या संग्रहातील प्रत्येक कथेत विशेष मुलांच्या वेगळेपणाचा उत्सव मुलांना सहज समजेल, उमजेल अशा पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. या गोष्टींच्या वाचनातून सामान्य मुले विशेष मुलांविषयी अधिक संवेदनशील आणि सुजाण होतील हा विश्वास आहे.    
- अपर्णा मोडक,  वरिष्ठ समन्वयक,  एकांश ट्रस्ट  

- ‘वेगळेपणाचा उत्सव’ संग्रहातील कथा मूळ इंग्रजीत आहेत.    
- मराठी अनुवाद गीतांजली जोशी यांनी केला.   
- शालिनी कागल, गौरी डांगे, लीला गौर, अनिता नारायण यांनी गोष्टी लिहिल्या आहेत.  
- हरियाणा येथील पल्लवांजली या शाळेतील मुलांनी मुखपृष्ठ केले आहे.  
- संग्रहातील कथांची चित्रे अन्वी शहा या विद्यार्थिनीने रेखाटली आहेत .
बातम्या आणखी आहेत...