Home | Maharashtra | Pune | news about culturul Minister Vinod Tawde

मंत्री विनोद तावडेंची प्रतिसादशून्यता चीड आणणारी; सांस्कृतिक क्षेत्राचा हल्लाबोल

प्रतिनिधी | Update - Oct 11, 2017, 02:41 AM IST

आजवर राज्याला जे सांस्कृतिक खात्याचे मंत्री मिळाले, त्यांनी राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सकारात्मक काम केल्याची परंपर

 • news about culturul Minister Vinod Tawde
  पुणे - आजवर राज्याला जे सांस्कृतिक खात्याचे मंत्री मिळाले, त्यांनी राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सकारात्मक काम केल्याची परंपरा दिसते. विद्यमान सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे मात्र या परंपरेला छेद देत आहेत. सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांसाठी मंत्रिमहोदयांकडे वेळ नाही. त्यांच्याशी केलेला कुठलाही पत्रव्यवहार त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.
  त्यांची ही अनास्था, दुर्लक्ष, औदासीन्य राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला हानिकारक असल्याची टीका तावडे यांच्यावर सांस्कृतिक क्षेत्रातील तीन अग्रगण्य संस्थांनी प्रातिनिधिक स्वरुपात येथे केली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून या असंतोषाला वाट करून देणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
  साहित्य, कला, संगीत, नाटक, चित्रपट, लोककला..या साऱ्यांतून सांस्कृतिक क्षेत्र आणि समाजजीवन समृद्ध होत असते. मात्र विनोद तावडे यांच्याकडे अन्य खात्यांचाही कार्यभार असल्याने त्यांना सांस्कृतिक विभागाकडे पाहण्यास पुरेसा वेळ मिळत नाही, त्यामुळे या विभागाला स्वतंत्र राज्यमंत्री असावा, अशीही मागणी करण्यात आली.

  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रातिनिधिक स्वरुपात सांस्कृतिक क्षेत्राकडे केल्या जाणाऱ्या दुर्लक्षाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बैठकीसाठी वेळ द्यावी. या बैठकीला मंत्र्यांसह प्रमुख संबंधित खात्यांचे सचिवही असावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

  सांस्कृतिक मंत्र्यांनी आणि त्यांच्या विभागाने संवादी राहावे. ज्या संस्था शतकभरापासून कार्यरत आहेत, त्या संस्थांच्या प्रतिनिधींना वेळ द्यावा. १४ वर्षांपूर्वीपासूनची वाढीव अनुदानाची मागणी विचारात घ्यावी.
  प्रा. मिलिंद जोशी,कार्याध्यक्ष – मसाप

  रंगभूमीची अवस्था भीषण
  रंगभूमीची अवस्था सध्या भीषण आहे. वेळीच लक्ष न घातल्यास ही समृद्ध कलापरंपरा बंद पडण्याच्या भीतीने आम्ही कलाकार भयग्रस्त आहोत.
  मोहन जोशी, अध्यक्ष – नाट्य परिषद

  नाट्यगृहांची अवस्था दयनीय
  राज्यातील व्यावसायिक नाट्यव्यवसाय धोक्यात आहे. नाट्यगृहांची अवस्था दयनीय आहे. शासकीय नियमावली संदिग्ध आहेत. तिकीट दरांवरील जीएसटीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.
  प्रसाद कांबळी - अध्यक्ष – नाट्यनिर्माता महासंघ

Trending