आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई साकारणार वेरूळच्या कैलास मंदिराची प्रतिकृती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानले जाणार्‍या वेरूळ (जि. औरंगाबाद) येथील कैलास मंदिराची प्रतिकृती हे या वर्षीच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सवातील देखाव्याचे आकर्षण ठरणार आहे. एकसंध पाषाणात खोदकाम करून घडवलेले हे जगातील एकमेव स्थापत्य मानले जाते. मूळ शिल्पाकृतीच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास देखाव्याचे कलादिग्दर्शक विवेक खटावकर यांनी व्यक्त केला.

दरवर्षी भव्य स्वरूपाच्या देखाव्यासाठी दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ प्रसिद्ध आहे. राज्यभरातून भाविक मंडळाचा देखावा पाहण्यासाठी आणि श्रींच्या दर्शनासाठी येतात. या वर्षी मंडळाने देशाचे भूषण मानल्या जाणार्‍या वेरूळ येथील कैलास मंदिराचा देखावा उभारण्याचा निर्णय केला असून देखाव्याचे काम सुरू झाले आहे. कैलास मंदिर ही 12 व्या शतकातील कलाकृती मानली जाते. या स्थापत्यकृतीची प्रतिकृती उभारणे आव्हानात्मक असल्याचे खटावकर यांनी सांगितले.

देखाव्याचे काम तसेच सजावटीचे काम 28 मेपासूनच सुरू झाले आहे. 40 सुतार, पेंटिंगचे काम करणारे 15 कलाकार आणि फायबर ग्लासचे काम करणारे 16 कलाकार, असा चमू या देखाव्यासाठी झटत आहे. प्रत्यक्ष उत्सव मंडपात 15 ऑगस्टपासून काम सुरू केले जाईल, असे खटावकर म्हणाले.

दहा वेळा कैलासला भेट
वेरूळच्या कैलास मंदिराचा देखावा 90 फूट लांब, 90 फूट उंच आणि 52 फूट रुंदीचा असेल. मंदिराच्या दर्शनी बाजूला दोन विजयस्तंभ असतील. मूळ कलाकृती काळ्या पाषाणात घडवली आहे. देखाव्यात ते लाकडाचे असेल. काही ठिकाणी फायबरचा वापर केला जाईल. सात मजली कळस हे कैलासचे वैशिष्ट्य आहे. कळसाच्या दर्शनी भागावर 60 गजशिल्पे असतील. तसेच वनराज सिंहाच्या प्रतिकृती असतील. काळ्या रंगाचा वापरही केला जाणार आहे. हे कैलास मंदिर पावणेदोन लाख दिव्यांच्या रोषणाईने झगमगेल. याशिवाय एलईडी प्रकाशझोतही सोडले जाणार आहेत. या कामासाठी किमान दहा वेळा कैलासला भेट दिली, अशी माहिती विवेक खटावकर यांनी दिली.