आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेटाबंदीला विराेध: पुण्यात ‘राष्ट्रवादी’च्या आंदोलनाचा फज्जा, पवारांसह शंभर- सव्वाशेच कार्यकर्ते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेप्रमाणे सोमवारी पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नोटाबंदीविरोधी आंदोलन करण्यात आले. मात्र, पक्षाचे शंभर- सव्वाशे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अपवाद वगळता सर्वसामान्य पुणेकरांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आल्याने आंदोलनाचा फज्जा उडाला. नागरिकांचा प्रतिसाद न मिळाल्याने काही वेळातच आंदोलन गुंडाळण्याचा निर्णय नेत्यांना घ्यावा लागला.  

पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. खासदार व शहराध्यक्ष वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, महापौर प्रशांत जगताप यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते. पैसे काढण्यासाठी एटीएमच्या रांगेत उभे राहिल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्यांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.  

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अाठ नोव्हेंबरला अचानक पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्या. देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी काळा पैसा नष्ट केला जात असल्याच्या भावनेतून आम्ही या निर्णयाचे स्वागत केले. प्रत्यक्षात मोदींनी हा निर्णय कोणतीही पूर्वतयारी न करता हुकूमशाही पद्धतीने घेतला,’ अशी टीका पवार यांनी केली. या निर्णयामुळे गोंधळलेल्या अवस्थेत नागरिकांना आर्थिक तणावाला सामोरे जावे लागले. कृषी व्यवस्था मोडकळीस आली. कष्टकरी व असंघटित कामागारांवर बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आली. छोट्या व्यावसायिकांचे धंदे बंद पडले. मोठे उद्योग कामगार कपात करू लागले आहेत. या सर्वसामान्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आंदोलन करत असल्याचे 
पवार यांनी सांगितले.  
 
बारामतीत रास्ता राेकाे, एटीएमची अंत्ययात्रा  
बारामती | बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही साेमवारी साेलापूर- पुणे महामार्गावर  केडगाव चौफुला येथे रास्ता राेकाे अांदाेलन करून नाेटाबंदीच्या निर्णयाचा निषेध केला. वारकऱ्यांप्रमाणे हातात टाळ घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनाेखे अांदाेलन केले. राष्ट्रवादी भवनजवळही रास्ता राेकाे करण्यात अाला. दाैंडमधील अांदाेलनाही शेकडाे कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात भाेरमध्ये एटीएमच्या प्रतिकृतीची अंत्ययात्रा काढून माेदी सरकारचा निषेध करण्यात अाला.
 
आझम पानसरे यांचा पवारांना धक्का  
पिंपरी-चिंचवडमधील ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी रविवारी मध्यरात्री मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपत प्रवेश केला.‘राष्ट्रवादी’साठी हा मोठा धक्का मानला जातो. यासंदर्भात विचारले असता पवार म्हणाले, ‘सत्तेसाठी त्यांनी भाजपत प्रवेश केला आहे. यावर पिंपरी-चिंचवडमध्ये जाऊनच मी बोलणार आहे.’ दरम्यान,  पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आणि अल्पसंख्याक समाजातील वजनदार नेते म्हणून ओळखले जाणारे पानसरे शरद पवारांचे खंदे समर्थक होते. 
 
मावळच्या अांदाेलनात मोदींचाच जयघोष  
‘राष्ट्रवादी’च्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत मावळमध्येही आंदोलन करण्यात आले. या वेळी वाघ यांनी ‘अब की बार’ म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘मोदी सरकार’ असे म्हणत त्यांची घोषणा पूर्ण केली. विराेधी आंदोलनात मोदींचाच जयजयकार ऐकायला मिळाल्याने जाणाऱ्या- येणाऱ्यांची चांगलीच करमणूक झाली. वाघ यांच्यावर मात्र खजिल होण्याची वेळ आली. ‘अबकी बार, नही रहेगी सरकार’ अशी राष्ट्रवादीची घाेषणा हाेती. 
 
नाशिक-  नाेटाबंदीविराेधात नाशिक शहर व जिल्ह्यातही साेमवारी राष्ट्रवादीच्या वतीने अांदाेलन करण्यात अाले. शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करण्यात अाली. काही ठिकाणी या अांदाेलनाला उत्स्फूर्त, तर काही ठिकाणी अतिशय थंड प्रतिसाद मिळाला. नाेटाबंदीमुळे लाेक त्रस्त असल्याचे विराेधक सांगत असले तरी प्रत्यक्षात या अांदाेलनात सामान्य नागरिकांचा सहभाग फारसा दिसला नाही. सिन्नरमध्ये तर अवघ्या अाठ- दहा कार्यकर्त्यांनीच रास्ता राेकाे करण्याचा प्रयत्न केला.