आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाश्चात्त्य अभ्यासकांनाही संत साहित्याची भुरळ. मराठी संत संप्रदायांवर संशोधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - समतेच्या विचारांनी सारा समाज एका सूत्रात बांधणार्‍या मराठी संत साहित्याची भुरळ अनेक पाश्चात्त्य अभ्यासकांनाही पडली आहे. गेल्या पाऊणशे वर्षांपासून जगभरातील विविध देशांचे अभ्यासक मराठी संतपरंपरा, संतसाहित्य आणि वारी यांचा अभ्यास करत आहेत.
मध्ययुगीन समाज जेव्हा अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत होता, तेव्हा समतेचा विचार घेऊन मराठी संतांनी जी भक्तीची ज्योत जागवली, तिचे महत्त्व अनन्यसाधारण होते, असे मत या विदेशी अभ्यासकांनी मांडले आहे.

संत साहित्याचा अभ्यास स्वातंत्र्यपूर्व काळात केला तो ब्रिटिश अभ्यासक जस्टिन अ‍ॅबॅट यांनी. संत भानुदास, एकनाथ, दासोपंत, बहिणाबाई, तुकोबा, रामदास या संतांच्या साहित्याचा अभ्यास त्याने केला होता. त्याचा काळ 1853 ते 1932 असा आहे. मिचेल मरे या ख्रिस्ती धर्मोपदेशकाने मराठी संतांवर दहा पुस्तके लिहिली. पंढरपूरचा विठोबा आणि तुकारामांची गोष्ट असे ग्रंथ त्याने लिहिले. लिओनार्ड जॉन सेज्विक यांनी मराठी संतांच्या रचना हे जगातील सर्वश्रेष्ठ काव्य आहे, अशा शब्दांत संत साहित्याचा गौरव केला आहे. डब्ल्यू डॉडरेट, रेव्हरंड जे. एफ. एडवर्डस, डॉ. निकोल मॅकॅनिहल, प्रा. झूल ब्लोक, फादर जी. ए. डलरी (फ्रेंच), डॉ. आय. एम. पी. रिसाईड, प्रा. इवानो शिमा, प्रा. जॉन स्टॅन्ले, प्रा. एरिक सॅन्ड (डेन्मार्क), प्रा. गुंथर सोन्थायमर (जर्मनी), जॉर्जिया झोग्राफ (रशिया), प्रा. विनान्द कॅलेवर्ट (बेल्जियम) अशा अनेक विदेशी अभ्यासकांनी संतविचारांवर संशोधन केले.

पाश्चात्त्य स्त्रियांचेही योगदान
मॅडम एच. एम. लॅम्बर्ट यांनी ज्ञानेश्वरीचे इंग्रजी भाषांतर केले. प्रा. शार्लोद वोदविल या फ्रेंच अभ्यासकांनी वारकरी संप्रदाय, पंढरपूर अणि मराठी संतरचनांवर त्यांनी विपुल लेखन केले. ज्ञानदेवांचा हरिपाठ त्यांनी फ्रेंचमध्ये अनुवादित केला. कॅथोरिना किन्ले या जर्मन अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत यांच्याशी त्यांचा स्नेह होता. ज्ञानेश्वर स्टडीज असा ग्रंथ त्यांनी सिद्ध केला. डॉ. चिहिरो कोईसा ही जपानी युवती सध्या ज्ञानेश्वरीच्या जपानी भाषांतरात गुंतली आहे.
ज्ञानेश्वरांच्या भक्तिविषयक तत्त्वज्ञानाचे सामाजिक परिणाम, या विषयात त्यांनी पीएचडी मिळवली आहे. डॉ. अ‍ॅन फेल्डहाऊस या विदुषी तर 1970 पासून नियमित भारतात येऊन संत परंपरा, लोकदेवता यांचा अभ्यास करत आहेत. डॉ. इरिना ग्लुष्कोव्ह या रशियन विदुषीही गेल्या दहा वर्षांपासून संत तुकाराम, वारकरी संप्रदायाचा अभ्यास करत आहेत.

अभ्यास उल्लेखनीय
विदेशी अभ्यासकांनी संत साहित्य, वारकरी संप्रदायाचा केलेला अभ्यास उल्लेखनीय आहे. वस्तुनिष्ठ दृष्टिकोन, शास्त्रीय पद्धती, फिल्डवर्क, निर्भीड मतप्रदर्शन, उपलब्ध सामग्रीचा साकल्याने वापर, प्रत्यक्ष संपर्क, संबंधित भाषेचा सखोल अभ्यास, विषय विविध माध्यमांतून मांडण्याची सफाई, सतत संशोधन अपडेट करणे, ही त्यांच्या अभ्यासाची वैशिष्ट्ये. वा. ल. मंजूळ, मराठी हस्तलिखित केंद्राचे प्रमुख व संतसाहित्याचे अभ्यासक.