आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेडविरोधी आंदोलने; पालिका उभारणार नवा पुतळा, गडकरींचा पुतळा हटविल्याच्या पुुण्यात संतप्त प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- छत्रपती संभाजी राजेंची बदनामी केल्याचा अाराेप करत प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांच्या संभाजी उद्यानातील पुतळ्याची ताेडफाेड करणाऱ्या संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांच्या विराेधात पुण्यात विविध संघटनांनी निदर्शने करून संताप व्यक्त केला. पालकमंत्री गिरीश बापट यांनी ही घटना निंदनीय असल्याचे सांगत  प्रकरणाच्या चाैकशीचे अादेश दिले अाहेत, तर महापालिकेने या जागी पुन्हा गडकरींचा पुतळा उभारण्याची घाेषणा केली अाहे.
  
साेमवारी मध्यरात्री किंवा मंगळवारी पहाटे काही कार्यकर्त्यांनी ताेडफाेड करून हा पुतळा संभाजी उद्यानातून हलवल्याचे सीसीटीव्ही फुटेज पाेलिसांना प्राप्त झाले असून त्याअाधारे दाेषींविराेधात सबळ पुरावा हाती लागल्याचा दावा पाेेलिसांनी केला अाहे. या कार्यकर्त्यांविराेधात कडक कारवाई करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष शाखेचे पाेलिस उपअायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले, तर महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी संभाजी उद्यानात निषेध आंदोलन केले. उद्यानाच्या दारातच त्यांनी निषेध सभाही घेतली. दरम्यान, या घटनेनंतर अनुचित घटना घडू नये अथवा तणावाची परिस्थिती उद्भवू नये याकरिता पाेलिसांनी मंगळवारी दिवसभर छत्रपती संभाजी उद्यान व डेक्कन येथील संभाजी पुतळा या ठिकाणी पाेलिस बंदाेबस्त तैनात केला हाेता. तसेच या घटनेची माहिती कळताच सकाळपासूनच संभाजी उद्यानात बघ्याची गर्दी वाढू लागली हाेती. खबरदारीचा उपाय म्हणून पाेलिसांनी या उद्यानात दिवसभर प्रवेशबंदी केली.  

गडकरींचा पुतळा पुन्हा उभारू : महापौर  
उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यावरून सुरू झालेले राजकारण दुर्दैवी आहे. महापालिकेच्या वतीने पुन्हा त्याच जागी गडकरींचा पुतळा उभारला जाईल. तसेच या प्रकरणी चौकशी केली जाईल. पुणेकरांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया महापौर जगताप यांनी दिली. 
 
मुख्यमंत्री फडणवीस अाज देणार उत्तर  
या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काेणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अापण उद्या (बुधवारी) पुण्यात जाणार असून तिथेच याविषयी बाेलणार असल्याचे संकेत मात्र त्यांनी दिले.

पुतळा हटविण्याचे कृत्य मुघलांच्या औलादीचेच : नीलम गाेऱ्हे  
‘राम गणेश गडकरी यांच्या लेखनाविषयी मराठी माणसांना नितांत आदर आहे. त्यांचे मराठी साहित्यात मोठे योगदान आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनीच मराठी सारस्वताचा पुतळा अशा प्रकारे हटवण्यात यावा, हे दुर्दैवी आहे. पूर्वी मुघलांनी पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता. त्यांची औलादच पुतळा हटवण्यासारखे कृत्य करू शकते,’ अशी टीका शिवसेनेच्या आमदार नीलम गाेऱ्हे यांनी केली. तसेच घटनेचा तीव्र शब्दात निषेधही केला.

पुराेगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना : अजित पवार
‘राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्याची घटना निंदनीय व पुराेगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी अाहे.  निवडणुका आल्या की काही संघटना असे कृत्य करतात,’ अशा शब्दात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी ब्रिगेडच्या कृत्याचा निषेध केला अाहे.

संभाजीराजांचा पुतळा उभारा : संताेष शिंदे  
या घटनेप्रकरणी पाेलिसांनी हर्षवर्धन महादेव मगदूम, प्रदीप भानुदास कणसे, स्वप्निल सूर्यकांत काळे व गणेश देविदास कारले या चाैघांना अटक केली अाहे. त्यापैकी मगदुम व काळे हे नाेकरी करतात. कारले याचा ट्रॅव्हल्सचा तर कणसे याचा पंप विक्रीचा व्यवसाय अाहे. संभाजी ब्रिगेडने या कृत्याबद्दल साेशल मीडियावर पाेस्ट टाकल्यानंतर ही घटना सर्वांना कळाली. संभाजी ब्रिगेडचे संताेष शिंदे यांनी सांगितले की, ‘गडकरींचा पुतळा अामच्या कार्यकर्त्यांनी हटविल्याचे अाम्ही समर्थन करताे. गडकरींनी त्यांच्या नाटक, कादंबरीतून छत्रपती संभाजी महाराजांची विविध संबाेधने वापरून चारित्र्यहनन केलेले अाहे. या उद्यानातील गडकरींचा पुतळा हटवून त्याजागी संभाजीराजांचा पुतळा बसवावा याकरिता मागील सात ते अाठ वर्षांपासून ब्रिगेडच्या वतीने महापालिकेला पत्रव्यवहार करण्यात येत हाेता. मात्र, त्याची दखल न घेतल्याने, कार्यकर्त्यांनी स्वत:च पुतळा हटविला अाहे. संभाजी ब्रिगेड राजकारणात प्रवेश करत असली तरी हे प्रकरण राजकीय फायद्याकरिता करण्यात अालेले नाही,’ अशी बाजू त्यांनी मांडली.  
बातम्या आणखी आहेत...