आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज भारत-इंग्लंड लढतीपासून ‘विराट पर्वा’ ची सुरुवात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 पुणे - विराट कोहली पर्वाला रविवारपासून सुरुवात होत आहे. कोहली रविवारी इंग्लंडविरुद्ध मालिकेतील पहिल्या वनडेत टीम इंडियाचे नेतृत्व करेल. भारताचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनी विराट कोहलीच्या नेतृत्वात प्रथमच खेळेल. धोनीने मागच्या आठवड्यात वनडे, टी-२० चे कर्णधारपद सोडले होते. आता कोहली भारताच्या तिन्ही संघांचा कर्णधार आहे.  

यष्टिरक्षक फलंदाज धोनी कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाकडून पहिल्यांदा खेळणार आहे. धोनीने नेतृत्व सोडले असल्याने तो आता फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो. दुसरीकडे कसोटीत धावांचा पाऊस पाडल्यानंतर कोहलीकडून तो फॉर्म वनडेतही कायम ठेवण्याची आशा आहे. धोनी कर्णधार म्हणून नेहमी “कॅप्टन कुल’ म्हणून जगभर ओळखला गेला, तर कोहली आक्रमक स्वभावाचा नेता आहे. या दोघांची केमिस्ट्री मैदानात आता कशी रंगते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. इंग्लंडविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका टीम इंडियासाठी जून महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने महत्त्वाची असेल.   

युवराजकडे असेल लक्ष : युवराजसिंगने टीम इंडियात पुनरागमन केले असून मधल्या फळीत त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. युवीने सराव सामन्यात अर्धशतक ठोकले होते. मनीष पांडे, केदार जाधव हे युवा खेळाडूसुद्धा संघात सामील असल्याने युवराजवर चांगल्या कामगिरीचा दबाव असेल.
 
धोनीकडून बरेच शिकलो : कोहली
इंग्लंडविरुद्ध मालिका म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीआधीची पूर्वतयारी आहे. त्यामुळे आम्ही मालिकेत कसून खेळणार आहोत. या मालिकेतील सर्वोत्तम खेळ करणारेच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात असतील, असे कोहलीने सूचित केले. धोनीकडूनही मी बरेच काही शिकलो. परिस्थिती आपल्याला साथ देत नसते, त्या वेळी खेळ कसा करायचा. प्रतिस्पर्ध्याला कसे नामोहरम करायचे, ते धोनीकडून शिकलो, असेही कोहलीने म्हटले.