आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयांनी शोधला 20 लाख अब्ज सूर्यांएवढ्या अाकाशगंगांचा महासमूह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी अंतराळात हजारो आकाशगंगाचा (गॅलेक्झी) महासमूह (सुपर क्लस्टर) शोधला असून त्याला ‘सरस्वती’ नाव देण्यात आले आहे. पुण्यातील ‘आयुका’ या खगोलशास्त्रीय संस्थेचे संचालक सोमक रायचौधरी यांनी ही माहिती दिली.
 
या संशोधनात आयुकाचे जयदीप बागची, शिशिर सांख्यायन, प्रतीक दाभाडे तसेच इतरही शास्त्रज्ञांचा सहभाग आहे. याबाबतचा प्रबंध अमेरिकेच्या अॅस्ट्रोफिजिकल जर्नल या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे या शोधात सहभागी असणारे सर्व संशोधक, शास्त्रज्ञ, अभ्यासक भारतीय आहेत. मात्र त्यांनी हा शोध लावण्यासाठी वापरलेला डाटा ‘स्लोन डिजिटल स्काय सर्व्हे’ या आंतरराष्ट्रीय माहिती केंद्रातील आहे. पृथ्वीपासून कित्येक प्रकाशवर्षे अंतरावरील अनेक दीर्घिका आपल्याला ज्ञात आहेत. त्यांचा अभ्यासही जागतिक पातळीवर सुरू आहे. मात्र आजवर इतक्या प्रचंड घनतेचा आणि महाप्रचंड व्याप्तीचा दीर्घिकासमूह कधीच आढळून आला नव्हता. इंटर यूनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅॅस्ट्रॉनॉमी अॅंड अॅस्ट्रॉफिजिक्सच्या (आयुका) शास्त्रज्ञांसह इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) च्या संशोधकांचाही या शोधात सहभाग आहे. आपल्या आकाशगंगेतील सर्व दीर्घिकांचा आजवर आपण शोध घेतला असून, त्यांचे वस्तुमान, आकारमान, अंतरे यांचीही माहिती आपल्याकडे आहे. मात्र आता प्रथमच आजवर अज्ञात असणाऱ्या दीर्घिकांचा महासमूह भारतीय शास्त्रज्ञांनी शोधल्याने विश्वरचनाशास्त्राला नवा आयाम मिळणार आहे. 
 
सरस्वती हे अन्वर्थक नाव
नव्याने शोधलेल्या दीर्घिकांच्या महासमूहाचे नामकरण जाणीवपूर्वक ‘सरस्वती’ असे करण्यात आले आहे. एक तर सरस्वती ही ज्ञानाची, वाणीची देवता मानली जाते. दुसरा संदर्भ हा लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा आहे. लुप्त सरस्वतीला पूर्वी अनेक नद्या येऊन मिळत असत आणि अंतिमत: तिचा प्रवाह विशाल बनत असे. दीर्घिकांचा महासमूहदेखिल हजारो दीर्घिकांच्या (आकाशगंगांचा) मिळून बनला आहे आणि त्याचे अस्तित्व हे आजवरच्या ज्ञात विश्वरचनेवर नवा प्रकाश टाकणारे असल्याने सरस्वती हे नाव अन्वर्थक वाटत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 
 
महासमूहाचे ‘सरस्वती’ असे नामकरण
- तब्बल २० लाख अब्ज सूर्य मिळून जितका आकार होईल, तितका मोठा हा आकाशगंगांचा महासमूह आहे.
-हा समूह पृथ्वीपासून ४०० कोटी प्रकाशवर्षे अंतरावर आहे.
- या समूहाचे वय १ हजार कोटी वर्षे आहे.  
- या महासमूहाचे वस्तूमान ६० कोटी प्रकाशवर्षे इतके आहे. 
- एका क्लस्टरमध्ये १ ते १० हजार आकाशगंगा असतात. सुपरक्लस्टरमध्ये ४० ते ४३ क्लस्टर असतात.
बातम्या आणखी आहेत...