आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोलकरांच्या आत्म्याशी संवाद? पोलिसांकडून तंत्रविद्येचा वापर; पत्रकाराचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - हयातभर अंधश्रद्धेविद्ध रान उठवणारे अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चक्क एका भोंदूबाबाची मदत घेऊन दाभोलकर यांच्या आत्म्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी केलेल्या या मंत्रतंत्रविद्येच्या वापराचा भंडाफोड मुक्त पत्रकार आशिष खेतान यांनी इंग्रजी नियतकालिक ‘आऊटलूक’च्या ताज्या अंकात केला आहे.

दरम्यान, हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत प्रकरणात कायदेशीर मार्गांनीच तपास केल्याचा दावा तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केला आहे. नियतकालिक व खेतानविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणात पुरावे दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी दाभोलकर यांची दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांना अजूनही हत्याकांडाचा तपास लागलेला नाही. मात्र तपासात तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी एका मांत्रिकाच्या मदतीने दाभोलकर यांच्या आत्म्याशी संवाद साधत धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे या लेखात म्हटलेले आहे. पोळ यांनी तपासासाठी नेमलेल्या पथकात राष्ट्रपतिपदक विजेते निवृत्त सहायक पोलिस आयुक्त रणजित पांडुरंग अभ्यंकर, निवृत्त पोलिस शिपाई व स्वयंघोषित मांत्रिक मनीष ठाकूर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक व दोन शिपायांचा समावेश होता. पथकाला स्वतंत्र वाहन, निधी देऊन तपासाची मोकळीक दिलेली होती. या काळात मनीष ठाकूर याने तंत्रविद्येने दाभोलकरांचा आत्मा पाचारण करावा व खूनाविषयी आत्म्यालाच बोलते करावे अशी योजना आखली. त्यानुसार आयुक्तांच्या कार्यालयातील खोलीतच हा प्रयोग करण्यात आला.

खेतान यांची पोळ यांच्याशी कोल्हापुरात भेट
मार्चमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या पोळ यांच्या कोल्हापुरातील घरी खेतान यांनी त्यांची भेट घेतली. तेव्हा अभ्यंकर यांनीच ठाकूरशी ओळख करून दिल्याचे पोळ म्हणाले. मी आधी पुण्याचा सहायक आयुक्त झालो, तेव्हा अभ्यंकर उपनिरीक्षक होते. ठाकूरने तेव्हा अभ्यंकर यांना या पध्दतीने अनेक अवघड गुन्हयांची उकल करण्यास मदत केली होती. त्यामुळेच दाभोलकर हत्या प्रकरणी ठाकूरची मदत घेण्याचे मी ठरवले. काहीही करा, कुठेही जा पण दाभोलकरांच्या गुन्हेगारांचा तपास लागला पाहिजे, असे बजावून मी त्यांना गाडी, पैसै व मनुष्यबळ पुरवल्याचे पोळ यांनी सांगितले. आत्म्याशी झालेल्या संवादानुसार हत्येच्या एक दिवस आधी दाभोलकर मंत्रालयात गेले होते. तेव्हा दोन जण त्यांच्यामागे दादरला आले आणि दाभोलकरांच्याच बसमध्ये बसून पुण्याला आले, असा दावा ठाकूरने केल्याचे मासिकात सांगितले आहे.

तंत्र-मंत्रगिरी केली नाही : निवृत्त पोलिस ठाकूर
हल्लेखोरांच्या तपासासाठी निवृत्त कर्मचार्‍यांनी मदत करण्याचे आवाहन तत्कालीन पोलिस आयुक्तांनी केले होते. त्यानुसार आम्ही मदत करत होतो. मात्र तंत्र-मंत्र विद्या केली नाही, असा दावा मनीष ठाकूर यांनी केला आहे. मी ख्रिश्चन असून, अशा विद्या मानत नाही. शिवाय दौंड येथील प्रकाराची कथाही खोटी आहे, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.

सदर प्रकरणातील तपास अधिकारी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी सांगितले की, मांत्रिकाचा अथवा तंत्रमंत्राचा वापर तपास कामात आम्ही केलेला नाही. खेतान यांनी उघड केलेल्या प्रकाराबाबत आम्हास कोणतीही माहीती नाही.

गृह खात्याने चौकशी करावी : डॉ. हमीद
नियतकालिकातील आरोपांप्रकरणी गृह खात्याने अंतर्गत चौकशी करावी, अशी मागणी डॉ. दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद यांनी केली आहे. तपास करणारे अधिकारीच अंद्धश्रद्धेचे बळी ठरत असतील तर ते आरोपीचा शोध कसा घेणार, असा सवालही हमीद यांनी केला.

आत्म्याला आयुक्तांचे प्रश्न
निवृत्त पोलिस ठाकूरच्या शरीरात प्रवेश केलेल्या दाभोलकरांच्या आत्म्याला पोळ यांनी प्रश्न विचारले. त्यात हत्या होण्याच्या आदल्या दिवशी दाभोलकर कुठे होते, सोबत कोण होते, असे प्रश्न होते. ठाकूरने दिलेल्या उत्त्ांरानुसार पुढील तपास केला गेला. यासाठी इतरही 10-12 सैतानी आणि दैवी आत्म्यांची मदत घेण्यात आल्याचे ठाकूरने सांगितले. रेल्वेमध्ये असताना अभ्यंकर यांना राष्ट्रपती पदक मिळाले त्याचे श्रेय ते ठाकूरलाच देतात.

पोलिस शिपायावर प्लॅँचेट
आमीर खानच्या तलाश या सिनेमातील दृश्याप्रमाणे खोलीत पाण्याने भरलेले एक भांडे ठेवण्यात आले. मेणबत्त्या पेटवण्यात आल्या. त्यानंतर ठाकूर बेडवर झोपला. थोडयाच वेळात ठाकूरचे शरीर विलक्षणरित्या थरथरू लागले. याचा अर्थ दाभोलकरांच्या आत्म्याने त्याच्या शरीरात प्रवेश केला होता. तेव्हा ठाकूरचा आत्मा पाण्याच्या भांडयात जाऊन बसला, असा दावा ठाकूरनेच केलेला आहे.

आत्म्याने इंग्रजीतील उत्तरे टाळली
खेतान यांनी ठाकूरशी संपर्क साधून दाभोलकरांच्या आत्म्याशी संवाद साधून दे, अशी विनंती केली. तेव्हा ठाकूरने दौंडच्या रेल्वे स्टेशनजवळील त्याच्या घरी विधी करून दाभोलकरांचा आत्मा पाचारण केला. ठाकूरच्या शरीरात आत्म्याने प्रवेश केला होता. खेतान म्हणतात, दाभोलकर इंग्रजीचे जाणकार होते. म्हणून मी आत्म्याला इंग्रजीतून प्रश्न विचारले. तेव्हा ठाकूरने हिंदीतही बोलण्यास नकार दिला. फक्त मराठीत बोलण्यावर तो ठाम होता.