आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वाभिमानी’मुळे कारखाना विक्रीचे हत्यार सीएमकडे, न्यायालयात जाण्याचा शेट्टींचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात राज्यातल्या ४२ कारखान्यांची मातीमोल दराने विक्री झाली. ऊस उत्पादक, राज्य सरकार आणि करदात्या जनतेचे यामुळे दहा हजार कोटींचे नुकसान झाले. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह भाजपतील अनेक नेत्यांवर या घोटाळ्याचे आरोप आहेत. या पार्श्वभूमीवर‘स्वाभिमानी’च्या मागणीमुळे मुख्यमंत्र्यांच्या हाती नवे राजकीय हत्यार आल्याची चर्चा सहकार क्षेत्रात आहे.
‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, राजेश टोपे, फौजिया खान, काँग्रेसचे दिवंगत विलासराव देशमुख, अशोक चव्हाण तसेच ‘भाजप’चे दिवंगत गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, एकनाथ खडसे या व इतर काहींचा घोटाळ्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या सहभागामुळे सर्वच राजकीय पक्ष या घोटाळ्यासंबंधी मिठाची गुळणी धरून आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे, युवाध्यक्ष हंसराज वडघुले आदी या वेळी उपस्थित होते.

विक्री झालेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या खरेदीत सहभागी असलेल्या ७२ जणांचा शेट्टींनी तक्रारीत उल्लेख केला आहे. “महाराष्ट्राच्या गृहखात्याने तातडीने दखल घेत घोटाळे बहाद्दरांविरोधात एफआयआर दाखल करावा, अन्यथा कोर्टात दाद मागावी लागेल,” असा इशारा शेट्टी यांनी दिला. सहकारी कारखान्यांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी साखर आयुक्तांवर असते. प्रत्यक्षात कारखान्यांची विक्री कवडीमोलाने होताना साखर आयुक्तांनी डोळेझाक केली. आता तरी आयुक्तांनी गंभीर दखल घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘ईडी’ने दिली दिशा
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मेधा पाटकर यांच्यासह तीन वर्षांपूर्वी साखर कारखान्यांच्या विक्री घोटाळ्याविरोधात राजू शेट्टी यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. सत्ताबदलानंतर पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्री, आयकर खाते, सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांच्यापासून ते मुख्यमंत्री, सहकारमंत्री यांच्यापर्यंत सगळ्यांकडे तक्रार करूनही शेट्टींना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. न्यायालयाच्या आदेशाशिवाय किंवा पोलिसांकडे एफआयआर दाखल झाल्याशिवाय चौकशी करता येत नसल्याचे ‘ईडी’ने शेट्टींना सांगितले. म्हणून शेट्टींनी पोलिसांकडे तक्रार केली. “ईडी’च्या चौकशीमुळे कारखान्यांच्या विक्रीतला घोटाळा सिद्ध होईल. ‘ईडी’च्या कारवाईमुळेच छगन भुजबळ तुरुंगात गेले,’ असे शेट्टी यांनी निदर्शनास आणले.

सीएमची जबाबदारी वाढली
राजू शेट्टी यांच्या पोलिस तक्रारीमुळे गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांवरची जबाबदारी वाढली आहे. सहकार खातेसुद्धा भाजपकडेच आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्यासाठी राज्य सहकारी बँक, सहकार खाते आणि साखर आयुक्तालयाला मुख्यमंत्री कामाला लावणार का, हा प्रश्न आहे. कारखान्यांच्या विक्रीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची खात्री विरोधात असताना ज्या फडणवीसांना होती तेच फडणवीस मुख्यमंत्री होऊन दोन वर्षे झाली तरी कारवाई का करत नाहीत, याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...