आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकुमार ‘किशोर’चा ७५ हजारांचा टप्पा, गुलजार यांच्यापासून अनेक तरुण लेखक लिहिते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - बालकुमार वाचकांसाठी समर्पित असलेल्या ‘किशोर’च्या दिवाळी अंकाने यंदा आपल्या वाचकप्रियतेत मानाचा तुरा खोवला आहे. ‘किशोर’ने तब्बल ७५ हजार प्रतींचा विक्रम नोंदवला आहे. वाचनाचे, ज्ञान-विज्ञानाचे, संस्कारक्षम वाचनाचे भांडार ‘किशोर’ने बालकुमार वाचकांसाठी खुले केले आहे. या महत्त्वाच्या टप्प्यावर ज्येष्ठ साहित्यिक गुलजार यांच्यापासून ते ताज्या दमाच्या अवधूत डोंगरेपर्यंत अनेक लेखक मुलांसाठी ‘लिहिते’ झाले आहेत. ‘किशोर’चे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनी ही माहिती दिली.

‘किशोर’चे हे ४५ वे वर्ष आहे. किशोरवयीन वाचकांना दर्जेदार आणि अभिरुचीसंपन्न साहित्याच्या वाचनाची गोडी लावण्याचे काम ‘किशोर’ करत आहे. ‘किशोर’ बालभारतीच्या वतीने प्रकाशित होते. यंदा बालभारतीचे सुवर्णमहोत्सवी वर्षही आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, संवेदनशील मनावर उत्तम संस्कार घडावेत, ही किशोरची उद्दिष्टे आहेत. त्यांची परिपूर्ती करणारे साहित्य यंदाच्या ‘किशोर’मध्येही बालकुमार वाचकांच्या भेटीस येत आहे. ज्येष्ठ साहित्यिक गुलजार यांची ‘एकात दोन’ ही मजेदार कविता अंकात आहे. ती अमृता सुभाषने अनुवादित केली आहे. १३० पृष्ठांचा भरगच्च मजकूर, भरपूर रंगीत चित्रे आणि ज्येष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आकर्षक मुखपृष्ठ यामुळे अंक आकर्षक बनला आहे. बालकुमार वाचक नेहमीप्रमाणेच अंकाला उत्तम प्रतिसाद देतील, असा विश्वास आहे. अंक राज्यात सर्वत्र उपलब्ध करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
हे आहेत अंकाचे मानकरी
गुलजार, अच्युत गोडबोले, राजीव तांबे, अवधूत डोंगरे, प्रवीण दवणे, दासू वैद्य, रेणू गावस्कर, कविता महाजन, अरुण शेवते, विजया वाड, ज्ञानेश्वर मुळे, संजय भास्कर जोशी, रा. रं. बोराडे, रवींद्र गुर्जर, महावीर जोंधळे, बाळ फोंडके, राजन खान, इंद्रजित भालेराव, सुरेश वंदिले.
बातम्या आणखी आहेत...