आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ प्रसिद्धीच्या हव्यासातून साहित्य संमेलनस्थळाला विरोध;अध्यक्षपदासाठी इच्छुकांचे टीकास्त्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या  हिवरा आश्रम (जि. बुलडाणा) या स्थळाला  केला जाणारा विरोध निव्वळ हास्यास्पद आहे. या विरोधाला कुठलाही ठोस आधार नाही. केवळ वादाकरता वाद आणि प्रसिद्धीची हौस असेच या विरोधाचे स्वरूप आहे. अत्यंत  ग्रामीण भागात होणाऱ्या या संमेलनस्थळाविषयी  उलट आनंद व्यक्त करावासा वाटतो, अशी भूमिका नियोजित संमेलनाच्या  अध्यक्षपदासाठी  इच्छुक असणाऱ्या साहित्यिकांनी  ‘दिव्य मराठी’शी बोलताना मांडली.    
 
बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा अाश्रमाचे प्रमुख दिवंगत शुकदास महाराज यांच्यावर अाक्षेप घेत अंनिसने या ठिकाणी संमेलन घेण्यास विराेध केला अाहे. त्यावर प्रतिक्रिया देताना विदर्भातील प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार रवींद्र शोभणे म्हणाले, ‘ज्या वादग्रस्त व्यक्तीचे नाव घेऊन संमेलनस्थळाला विरोध केला जात आहे, ती व्यक्ती आता हयात नाही. त्यांच्याविषयीची  न्यायालयीन  प्रक्रियाही सर्वांसमोर आहे. शहरी भागांपुरती सीमित संमेलने ग्रामपंचायतीच्या  ठिकाणी नेणे, ही अत्यंत स्वागतार्ह बाब असताना, त्याला ३३ वर्षांपूर्वीच्या  संदर्भांनी विरोध करणे हास्यास्पद आहे आणि केवळ वादाकरिता वाद असाच हा प्रकार वाटतो.    
 
ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. किशोर सानप म्हणाले,‘संमेलनस्थळाविषयीचा  वाद मला आता निरर्थक वाटतो. ज्या व्यक्तीविषयी आक्षेप घेतला जात आहे, ती व्यक्ती हयात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या आश्रमात सकारात्मक कार्य सुरू आहे. उत्तम व्यवस्था करण्यासाठीच्या  पायाभूत सुविधा, उत्साही कार्यकर्ते, सक्षम साहित्यशाखांचे  पाठबळ, विदर्भ साहित्य संघाचे मार्गदर्शन असल्याने हिवरा आश्रम येथील संमेलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. उलट येथे सकारात्मक विचारमंथनाचा साहित्य उत्सव आयोजित करून, या जागेवरील पूर्वीचे मळभ दूर करण्याची ही उत्तम संधी आहे, असे मला वाटते.’   
 
ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र गुर्जर यांनी ‘पराकोटीच्या ग्रामीण भागातील संमेलनाचे मी स्वागतच करतो. वादग्रस्त व्यक्ती हयात नसताना, जुने वाद उकरून न काढता एक नवा सकारात्मक आदर्श उभा करण्याचा प्रयत्न या संमेलनातून व्हावा, असे सांगितले. महामंडळाने जे स्थळ निवडले आहे, त्याला माझा पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य आहे, असेही ते म्हणाले.  
 
ग्रामीण भागात साहित्य जागराचे स्वागत व्हावे  
प्रसिद्ध कथाकार, लेखक राजन खान म्हणाले, ‘कुठल्याही बुवाचे उदात्तीकरण नको, हे योग्य आहे. पण जो बुवा हयात नाही, आणि ज्या ठिकाणी चांगले कार्य सुरू आहे, कार्यकर्त्यांची फळी आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तालुका पातळीपेक्षाही जिथे ग्रामपंचायत स्तरावर काम चालते, अशा अत्यंत ग्रामीण भागात साहित्याचा जागर होत असेल, तर स्वागतच करायला हवे. महानगरात अडकलेली संमेलने अशीच ‘हलवली’ गेली पाहिजेत.’
बातम्या आणखी आहेत...