पुणे - एरवी सकाळी आठपासूनच गजबजलेल्या पुण्याने रविवारी मात्र लक्षावधींची गजबज असूनही नि:शब्दता अनुभवली, ती मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने.. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अत्याचाराच्या निषेधार्थ लक्षावधी मराठा समाजबांधव स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरले आणि कमालीची शिस्त, नियोजन आणि एकजुटीने दर्शन घडवत त्यांनी पुणेकरांना एका अविस्मरणीय ‘मूक क्रांति’चे साक्षीदार बनवले. या माेर्चाचे नेतृत्व पाच युवतींनी केले. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातून, खेड्यापाड्यांतून आलेल्या महिलांची, युवतींची प्रचंड संख्या हे मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले.
सकाळी ठीक साडेदहा वाजता डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पाच युवतींनी पुष्पहार अर्पण केला. उरी येथे हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि ऐतिहासिक मोर्चाची सुरुवात झाली. तत्पूर्वी शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर प्रचंड संख्येने मराठा बांधव जमले होते. महिलांचा जथ्था माेर्चाच्या अग्रभागी होता. मोठ्या संख्येने महिलांची, युवतींची उपस्थिती होती. विशेषत: महाविद्यालयीन तरुणाईची संख्या लक्षणीय होती. बहुसंख्य मंडळींच्या हातात भगवे ध्वज, घोषणा लिहिलेले फलक होते. काही लोक दंडावर, मनगटावर काळ्या फिती लावून माेर्चात सहभागी झाले होते. सर्वांच्या मस्तकावर ‘एक मराठा, लाख मराठा’ असे लिहिलेली टोपी किंवा केशरी फिती होत्या.
माेर्चाला प्रारंभ होताच लक्षावधी मराठा समाजबांधव शिस्तीत उभे राहिले. महिलांचा जथ्था पुढे सरकल्यावर ध्वनिक्षेपकावरून दिल्या जाणाऱ्या सूचनांनुसार केळकर रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता अशा सर्व ठिकाणी मोर्चात सहभागी होण्यासाठी थांबलेल्या बांधवांना गटागटाने मुख्य मोर्चामार्गावर सोडण्यात आले. हे सर्व अतिशय शांतपणे, शिस्तीने, कुठल्याही गोंधळाविना सुरू होते.
छत्रपती संभाजी राजे यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक, सोन्या मारुती चौक, लतरंजीवाला चौक, क्वार्टर गेट, पॉवर हाऊस, कैईएम रुग्णालय, लाल देऊळ, जिल्हा परिषद मार्गावरून विधान भवन परिसरात पोहोचला. माेर्चाच्या प्रारंभी युवती, महिला, विद्यार्थी, युवक गट, अन्य पुरुष बांधव आणि सर्वात शेवटी राजकीय नेते व स्वच्छता स्वयंसेवकांचा गट असा क्रम होता. काही अपंग बांधवही सहभागी झाले होते. डॉक्टर आणि वकील मंडळींचाही मोठा सहभाग होता.
पाच युवतींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन दिले. या निवेदनाचे वाचन एका युवतीने केले. राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. मोहनी पलांडे, अर्चना भोर, सुचिता भालेराव या युवतींनी मनोगत मांडले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन माेर्चाची सांगता झाली.
संभाजीराजे, उदयनराजे, अजित पवार सहभागी
छत्रपती संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार अरविंद सावंत, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम, आमदार भाई जगताप, बाळा भेगडे, मेधा कुलकर्णी अादी सर्वपक्षीय मंडळींसह धावपटू ललिता बाबरही माेर्चात सहभागी हाेती.
स्वच्छता स्वयंसवेकांचे कौतुकास्पद काममाेर्चेकऱ्यांसाठी पाणी, पेय, नाष्ट्याची पाकिटे, बिस्किटांचे पुडे, संत्र्याच्या गोळ्या देण्यात येत होत्या, पण या कशाचाही कचरा मोर्चा गेल्यावर राहू नये, याची काळजी स्वच्छता स्वयंसेवकांनी घेतली. मोर्चाच्या अखेरीस राहून त्यांनी रस्त्यावर पडलेल्या पाण्याच्या बाटल्या, पाऊचेस, गोळ्यांची पाकिटे, थंड पेयांचे बॉक्सेस, द्रोण.. असा सर्व कचरा लगेच साफ केला. माेर्चाला पाठिंबा व्यक्त करणारे फलक लावून मोर्चेकऱ्यांसाठी विविध सेवा देणाऱ्या मंडळांची मोठी संख्या मोर्चामार्गावर होती. दरम्यान, माेर्चाच्या मार्गावरील जवळपास सर्व गणेश मंडळांनी खानपान सेवा देऊ केली होती. यामध्ये मुस्लिम समाजबांधवांचा लक्षणीय सहभाग होता.