आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ.भा.मराठी साहित्य संमेलनात नावीन्याच्या नुसत्या घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेत नावीन्य आणू, अशी घोषणा करणाऱ्या साहित्य महामंडळाने पिंपरी येथे होणाऱ्या संमेलनातही तेच परिसंवाद, तीच कविसंमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम यांची री ओढल्याने केलेल्या घोषणा पोकळ असल्याचे सिद्ध झाले आहे. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानपीठप्राप्त अन्य भाषिक लेखकांशी संवादाची संधी रसिकांना मिळेल.
१५ जानेवारीपासून होणाऱ्या पिंपरी येथील साहित्य संमेलनात तब्बल १२ परिसंवाद होणार आहेत. त्यातील विषयांमध्येही नावीन्य नाही. दरवर्षीप्रमाणेच निमंत्रितांचे व खुले कविसंमेलन होणार आहे. त्यामुळे साहित्य महामंडळाकडे कल्पकता, नावीन्य, प्रयोगशीलतेची वानवा असल्याचे चित्र समोर आले आहे.
ठळक कार्यक्रम
१२ परिसंवाद, ३ मान्यवरांशी मुलाखती, ३ सांस्कृतिक कार्यक्रम, २ कविसंमेलने, कवी कट्टा, नव्या पुस्तकांसाठी प्रकाशन मंच, युवा वाचक, लेखकांसाठी युवा मंच, बालआनंद मेळावा, ‘लेखक तुमच्या भेटीला’ हा कार्यक्रम, अभिजात कथांचे वाचन, कथाकथन , सर्व कार्यक्रमांसाठी मुख्य मंडप, दोन सभागृहे, मुख्य मंडपात ३० हजार रसिकांची सोय
असे होतील परिसंवाद
- मराठी समीक्षा, किती संपन्न, किती थिटी
- मराठी वाङ‌्मयातील पुरस्कारांचे सांस्कृतिक व सामाजिक स्थान
- १९८० नंतरची मराठी कविता स्त्री केंद्रित आहे
- मराठी भाषेत व्यवहार आणि व्यवहारात मराठी भाषा
- मराठी साहित्यातील विनोद आणि आजचे मराठी साहित्य
- माध्यमातील स्त्री प्रतिमा आणि भारतीय संस्कृती
- आजची तरुणाई काय वाचते – काय लिहिते
- श्रमिक महिलांच्या व्यथा आणि लेखकांच्या कथा
- ज्ञानपीठप्राप्त लेखकांशी संवाद
- मराठी साहित्यातील उद्योग जगताचे चित्र आणि महाराष्ट्रातील उद्योजक
- बदलते सामाजिक, राजकीय अस्तित्व आणि दलित व ग्रामीण साहित्य
- बालसाहित्य आणि बालरंगभूमी सकस आहे का ?
नोंदणी शुल्क एक डिसेंबरपासून सुरू
- बाहेरगावच्या प्रतिनिधींसाठी २००० प्रत्येकी (निवास, भोजन, चहा, नाष्टा यांसह)
- स्थानिक प्रतिनिधींसाठी १२०० रुपये (निवास वगळता सर्व सोयी)
ग्रंथप्रदर्शनास ५०० गाळे, दुष्काळग्रस्तांनाही मदत
साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन महत्त्वाचे असते. घुमानच्या संमेलनावर प्रकाशकांनी बहिष्कार टाकला होता. यंदा मात्र प्रकाशक संमेलनाला प्रतिसाद देणार याची खात्री महामंडळाला आहे. त्यामुळे तब्बल ५०० गाळे प्रकाशकांसाठी उपलब्ध असतील. एका प्रकाशकाला अधिकाधिक ४ गाळे घेता येतील, अशी माहिती आयोजक संस्थेचे सचिन इटकर यांनी दिली. ग्रंथप्रदर्शनाच्या गाळ्यांचे भाडे तसेच प्रतिनिधी शुल्कातून जमा होणारी रक्कम दुष्काळग्रस्तांच्या निधीसाठी दिली जाईल, असे इटकर म्हणाले.