Home | Maharashtra | Pune | News about Meera kumari

देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्यापेक्षा जातपातमुक्त करावा; मीरा कुमार यांचे आवाहन

प्रतिनिधी | Update - Oct 29, 2017, 03:00 AM IST

देश काँग्रेसमुक्त करा, अशा घोषणा काही मंडळी देत आहेत. त्यापेक्षा देश जातपातमुक्त आणि गरिबीमुक्त करण्यासाठी काम करावे, अ

 • News about Meera kumari
  पुणे- देश काँग्रेसमुक्त करा, अशा घोषणा काही मंडळी देत आहेत. त्यापेक्षा देश जातपातमुक्त आणि गरिबीमुक्त करण्यासाठी काम करावे, असे आवाहन लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी शनिवारी येथे केले. मी तुमच्यासोबत ‘मन की बात’ करत नसून, ‘दिल की बात’ करत आहे, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

  ‘स्वातंत्र्यसेनानी ते उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम’ या चरित्रात्मक ग्रंथाचे प्रकाशन मीरा कुमार यांच्या हस्ते झाले. डॉ. विकास आबनावे यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. या वेळी काँग्रेसचे नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, जगजीवनराम यांचे नातू अभिजित अंशुल, नफेसिंह खोबा, त्रिमोहन कुमार, मनोजकुमार आदी उपस्थित होते.

  मीरा कुमार म्हणाल्या, ‘बाबू जगजीवनराम यांनी १९३५ मध्ये दलितांच्या मंदिर प्रवेशाबाबत पुण्यात सुरू झालेला लढा देशभरात नेला. त्यातून अनेक मंदिरांचे दरवाजे समाजातील वंचित घटकांना खुले झाले. पण अद्यापही काही दरवाजे बंदच आहेत. त्यामुळे त्यांनी सुरू केलेले कार्य संपलेले नाही. ती ज्वाला तेवत राहिली पाहिजे. जगजीवनराम यांच्यावरील या ग्रंथातून त्यासाठी प्रेरणा मिळेल,’ अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

  अन्य धर्मीयांचे काय?
  प्रमुख आठ धर्म आणि अनेक संप्रदाय असलेला आपला देश भाग्यवान आहे. हिंदूराष्ट्र असे म्हणताना एकाच धर्माला झुकते माप दिले तर अन्य धर्मीयांनी जायचे कुठे, असा सवाल मीरा कुमार यांनी विचारला. देशाला स्वातंत्र्य बंदुकीच्या गोळ्यांनी नव्हे, तर जनआंदोलनांतून मिळाल्याचे त्या म्हणाल्या.

Trending