आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मनसे’तर्फे महिलांना घरपट्टीत सवलत आणि मनपा कर्मचाऱ्यांसाठी पाळणाघरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक महापालिकेतील सत्तेच्या निमित्ताने ‘नवनिर्माणा’ची संधी मिळालेल्या मनसेने विद्यमान निवडणुकीतही महिला मतदारांसाठी दोन नावीन्यपूर्ण आश्वासने देत आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. नाशिकमधील ज्या महिलांच्या नावावर घरपट्टी असेल त्यांना सवलत आणि पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आवारात पाळणाघराची सोय या मनसेच्या जाहीरनाम्यातील महिला मतदारांसाठीची प्रमुख आश्वासने आहेत. 
 
महापालिकेवर मनसेचा ध्वज फडकविण्यात नाशिकमधील महिलांचा महत्त्वाचा वाटा होता. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या मांडणीमुळे प्रभावित होऊन नाशिकमधील युवक महिलांनी मोठ्या प्रमाणात मनसेच्या पारड्यात मते दिली, मनसेचे ४० नगरसेवक निवडून दिले आणि मनसेचा महापौर नाशिकमध्ये विराजमान झाले. या पार्श्वभूमीवर ‘मनसे’ने यावेळच्या जाहीरनाम्यातही नाशिकमधील महिला मतदारांसाठी स्वतंत्र चार आश्वासने दिली. महिलांसाठी सुरक्षित स्वच्छ स्वच्छतागृहे हा सर्वांप्रामाणेच मनसेच्या जाहीरनाम्यात प्राधान्याचा मुद्दा आहे. मात्र, फक्त स्वच्छतागृहे बांधून आम्ही थांबणार नाही, तर उद्योगांच्या सीएसआरमधून त्यांच्या देखभाल स्वच्छतेची व्यवस्थाही खासगी संस्थांमार्फत करू, असे आश्वासन मनसेने दिले आहे. दुसरे आश्वासन इतरांप्रमाणेच बचतगटांच्या उत्पादनांसाठी कायमस्वरूपी प्रदर्शन आणि विक्री व्यवस्थेचे आहे. मात्र, याशिवाय घरपट्टीत सवलत आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी पाळणाघरे या दोन आश्वासनांमधून मनसेने आपले वेगळेपण नाशिककरांच्या पुढे ठेवले आहे. महापालिका क्षेत्रात जितकी घरे महिलांच्या नावे असतील त्यांना घरपट्टीतून सवलत देण्याचे आश्वासन मनसेने दिले आहे. यामुळे मालमत्तेवर, विशेष: राहात्या घरावर महिलांची मालकी वाढल्यास महिलांच्या सामाजिक आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने तो महत्त्वाचा घटक ठरू शकतो. मनसेने दिलेले दुसरे आश्वासनही तेवढेच महत्त्वाचे आहे. पालिकेतील सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी पालिकेच्या आवारात पाळणाघरे सुरू करण्याचे आश्वासन मनसेने दिले आहे. खरेतर जिथे २० पेक्षा अधिक महिला कर्मचारी आहेत अशा प्रत्येक आस्थापनेत पाळणाघरे सुरू करण्याचा नियम कामगार कायद्यात सांगण्यात आला आहे. परंतु, त्याची फारशी अंमलबजावणी होताना दिसत नाही. पाळणाघराची व्यवस्था नाही म्हणून कित्येक स्त्रियांना क्षमता आणि शैक्षणिक पात्रता असूनही नोकरी सोडावी लागते. त्यामुळे पुरेशा आणि सुरक्षित पाळणाघरांची संख्या वाढणे गरजेचे असल्याची मागणी ‘दिव्य मराठी’च्या व्यासपीठावर महिला मतदारांनीही व्यक्त केली होती. मनसेने किमान महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पालिका आवारात पाळणाघरांचे आश्वासन देऊन अत्यंत महत्त्वाचा पर्याय पुढे आणला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...