आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा दाेन अाठवडे उशिराने मान्सून परतीचा प्रवास, पिकांना अाशादायी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पश्चिम राजस्थानातून नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मान्सून) परतीचा प्रवास येत्या तीन-चार दिवसांत सुरू होणार आहे. गेल्या वर्षी चार सप्टेंबरलाच पश्चिम राजस्थानातून मान्सून परत फिरला होता. यंदा त्यास दोन आठवड्यांचा उशीर झाला आहे.

‘पश्चिम राजस्थानातून मान्सून परत फिरण्यासाठी अनुकूल हवामान निर्मिती झाली आहे. येत्या तीन- चार दिवसात मान्सून परतीच्या मार्गाला लागेल,’ असे भारतीय हवामान खात्याने मंगळवारी स्पष्ट केले आहे. यंदा आतापर्यंत देशपातळीवर सरासरीच्या पाच टक्के पाऊस कमी झाल्यामुळे खरीप पिकांची स्थिती चिंताजनक आहे. परतीचा पाऊस ही तूट भरून काढले, अशी शेतकरीवर्गाला अपेक्षा आहे.

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत भारताला पाऊस देणाऱ्या मान्सूनवर देशातल्या २६ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे आणि पर्यायाने देशाचे अर्थकारण अवलंबून असते. मान्सूनचे केरळ किनारपट्टीवरचे यंदाचे आगमनसुद्धा आठवडाभर उशिराने अाठ जूनला झाले होते. महाराष्ट्रात १९ जूनला मान्सून दाखल झाला. मान्सूनने संपूर्ण देश व्यापेपर्यंत जुलैची १३ तारीख उजाडली. देशात वर्षभर पडणाऱ्या एकूण पावसापैकी ७० टक्के पाऊस मान्सूनमुळे पडतो. मान्सूनचे येणे- जाणे किती लवकर किंवा उशिरा झाले यावर पावसाचे प्रमाण ठरत नसल्याचे पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले. राजस्थानाच्या पश्चिम भागातील आर्द्रतेमध्ये आलेली घट, पाऊसमान, चक्राकार वाऱ्यांची दिशा आदी घटकांचा अभ्यास करून मान्सून परत फिरल्याचा निष्कर्ष काढला जातो. सन २००५ पासूनच्या अकरा वर्षांचा मान्सून पॅटर्न पाहिला तर २००७ मध्ये परतीचा प्रवास सर्वात उशिरा सुरू झाल्याचे दिसते. सन २००७ मध्ये ३० सप्टेंबरला राजस्थानातून मान्सून माघारी फिरला होता, तर सर्वात लवकर म्हणजे सन २००५ च्या दाेन सप्टेंबरला मान्सून परत फिरला होता, असे सांगण्यात आले.

दरम्यान, पश्चिम बंगालचा उपसागर आणि लगतच्या ओडिशा व उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील कमी दाबाचे क्षेत्र आता आंध्रच्या किनारपट्टीलगत सरकले आहे. या हवामान बदलामुळे विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या चार दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, ‘मान्सून रिटर्न’चा आढावा.... गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पूराची परिस्थिती
बातम्या आणखी आहेत...