आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे महानगरपालिकेत लोकसभा, विधानसभेचीच पुनरावृत्ती : रावसाहेब दानवे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘सुजाण पुणेकर मतदारांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला भरभरून मतदान केले. आता महापालिका निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती पुणेकर करतील आणि शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपच विजयी होईल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी सिंहगडावर व्यक्त केला.   

सोमवारी सकाळी दानवे यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्यासह पक्षाचे पुण्यातील सर्व उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी सिंहगडावर ‘कूच’ केली हाेती. या वेळी सर्व उमेदवारांना सिंहगडावरील पुणे दरवाजा या ऐतिहासिक ठिकाणी पारदर्शक, गतिमान, भ्रष्टाचारमुक्त आणि विकासोन्मुख सुशासनाची शपथ देण्यात आली.   

दानवे म्हणाले, ‘यावर्षी युती होऊ शकली नाही, हे दुर्दैवी आहे. आम्ही युती व्हावी, यासाठी खूप प्रयत्न केले. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्या काळात युती झाली होती. तेव्हाही भविष्यात युती कधी तुटली तरी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायचे नाहीत, कटुता ठेवायची नाही, असे त्या नेत्यांनी ठरवले होते. आम्ही त्याचे पालन केले, पण शिवसेना मात्र आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण प्रदूषित करत आहे’, अशी टीका दानवेंनी केली. ‘मनात, प्रचारात कटुता न ठेवता विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करा,’ असे अावाहनही दानवेंनी केले.  
 
शिवसेना अामचा राजकीय शत्रू नाहीच : दानवे   
शिवसेना सध्या अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरून निरर्थक टीका करत आहे. वस्तुत: मुख्यमंत्र्यांनी मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, असे याअाधीच स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या मुहूर्तावर शिवसेना करत असलेल्या या टीकेला आता जनताच मतपेटीतून उत्तर देईल. शिवसेना हा आमचा राजकीय शत्रू नाहीच. आमची लढाई काँग्रेसशी आहे. पण मुंबईत शिवसेनेचे फिक्सिंग आणि सेटिंग झाल्याचे दिसत आहे. नाशिकमध्ये भाजपने पैसे घेऊन तिकीटवाटप केले, हा आरोप गैरलागू आहे. सर्व आर्थिक व्यवहार पक्षनिधी म्हणून डीडी व धनादेशाद्वारेच केले जात आहेत, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.   
 
बातम्या आणखी आहेत...