आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणार्‍यांनी खुशाल पक्ष सोडून जावे, कुंपणावरील कार्यकर्त्यांना आबांचा सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - ‘लोकसभा निवडणुकीनंतर अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाण्याची भाषा करत आहेत. कुंपणावर असलेल्यांनी खुशाल पक्ष सोडून जावे,’ असा सल्ला पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला.

विधानसभा निवडणुकीच्या रविवारी सांगलीत राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात गृहमंत्री आर. आर. पाटील व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
या वेळी आर.आर. पाटील आणि जयंत पाटील या दोघांनीही कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. या वेळी अनेक पदाधिकार्‍यांनी पक्षाविषयीच्या तक्रारी जाहीरपणे बोलून दाखवल्या.
पलूस-कडेगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते पृथ्वीराज देशमुख यांनी ‘काँग्रेसशी युती करून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी राजकीय आत्महत्या करायची काय?,’ असा सवाल उपस्थित केला. पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघातून पक्षाने अरुण लाड यांना उमेदवारी न दिल्याची नाराजी अनेकांनी व्यक्त केली. लाड यांची बंडखोरी रोखली असती तर पक्षाला या निवडणुकीत यश मिळाले असते,’ असेही काहींनी बोलून दाखवले.

विशेष म्हणजे या वेळी पहिल्यांदाच तालुका स्तरावरील नेते उघडपणे पक्षाच्या धोरणांविषयी नाराजी व्यक्त करत होते. त्यावर आर.आर.पाटील म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत भाजपने खोटे बोलून विजय मिळवला. मात्र त्यांचा हा खोटारडेपणा आता उघड झाला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात भाजपचा खोटारडेपणा आणखी उघडा पडेल. राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीमधून कोणी पक्ष सोडून जाण्याची भाषा करत असेल तर त्यांनी खुशाल जावे. त्यांना कोणी अडवणार नाही. उगाचच कुंपणावर बसून पक्ष सोडण्याची भाषा करू नका. हिंमत असेल तर निघून जा.’

भाजपच शिवसेनेचा मोठा शत्रू
‘सध्या शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी चढाओढ लागली आहे. अजून सत्तेचा पत्ता नाही आणि हे लोक मुख्यमंत्रिपदासाठी भांडत आहेत. शिवसेनेला सर्वाधिक धोका हा त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून आहे,’ असा टोलाही आबांनी लगावला.