आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाव बदलून लपलेले आमदार कदम जाळ्यात, ‘सीआयडी’ची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यातील पंचतारांकित हाॅटेलात मध्यरात्री अटक केल्यानंतर अामदार रमेश कदम यांना मंगळवारी मुंबईत पाेलिस चाैकशीसाठी अाणण्यात अाले हाेते. - Divya Marathi
पुण्यातील पंचतारांकित हाॅटेलात मध्यरात्री अटक केल्यानंतर अामदार रमेश कदम यांना मंगळवारी मुंबईत पाेलिस चाैकशीसाठी अाणण्यात अाले हाेते.
पुणे - अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेले सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम अखेर सोमवारी रात्री सीआयडीच्या जाळ्यात सापडले. पुणे- अहमदनगर रस्त्यावरील कल्याणीनगर परिसरात असलेल्या पंचतारांकित हॉटेल ग्रँड हयातमध्ये कदम खोटे नाव सांगून लपून राहत होते. याची माहिती खबऱ्यामार्फत समजताच पथकाने तत्परतेने मध्यरात्रीच त्यांना साथीदारांसह अटक केली.
सीआयडीचे पोलिस महासंचालक संजय कुमार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, गुन्हा दाखल झाल्यापासून आमदार रमेश कदम सुमारे एक महिन्यापासून फरार होते. सीआयडीचे पथक त्यांचा विविध ठिकाणी शोध घेत होते.हॉटेल ग्रँड हयातमध्ये रविवारी रात्री ते वास्तव्यास आले होते. तेथून कदम यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. कदम यांच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल असल्याने, त्यांना अटक करून चौकशीसाठी तिकडे नेण्यात आले आहे. फरार असताना कदम यांनी कुठे वास्तव्य केले, त्यास कोणी सहकार्य केले याची चौकशी केली जाणार आहे.

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा अध्यक्ष असताना तब्बल ३०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा कदम यांच्यावर ठपका आहे. या घोटाळ्याविरोधात ३७०० पानांचा पुरावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागास (एसीबी) सादर केल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला आहे. त्यानंतर कदम यांच्यावर १९ जुलै रोजी मुंबईतील दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून अटकेच्या भीतीने २० जुलैपासून कदम फरार झाले होते. त्यानंतरच्या काळात सीआयडीने त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून राज्यशासनाला अहवाल सादर केला. तसेच अकलुज व पुणे येथून कदम यांच्या बहिणींना सीआयडीने ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडेही आमदार कदमांबाबत कसून चौकशी करण्यात आली होती.

काेट्यवधींची मालमत्ता : कदम यांच्या नावावर कांदिवलीत २.२५ काेटींचा फ्लॅट, अाैरंगाबादेत ११ काेटींची ६२ गुंठे जागा अाहे. महामंडळाच्या साडेनऊ काेटी रुपयांतून त्यांनी १६ गाड्यांची खरेदी केली, महामंडळाच्या पैशातून स्वत:च्या नावावर ५ काेटी रुपये हस्तांतरित करून घेतले हाेते. त्यांच्या ७१ लाखांच्या २ मर्सिडिज, ६१ लाखांची एक अाॅडीही जप्त करण्यात अाली अाहे.
झाेपेतच केली अटक
मातंग समाजाच्या कल्याणासाठी असलेल्या शासकीय िनधीवर डल्ला मारल्याचा अाराेप रमेश कदम यांच्यावर अाहे. हेच कदम पुण्यातील पंचतारांकित हाॅटेलमध्ये नाव बदलून राहत हाेते व पाेलिसांच्या डाेळ्यात धूळ फेक करत हाेते. सीअायडीचे पथक व येरवडा पाेलिस ठाण्याचे एक पथक यांनी साेमवारी मध्यरात्री दाेन वाजण्याच्या सुमारास पुण्यातील अालिशान हाॅटेलात वातानुकूलित खाेलीत झाेपेत असलेल्या कदम यांच्यावर छापा टाकून जेरबंद केले.
पाेलिस शाेधात, मात्र कदमांच्या भेटीगाठी
महामंडळातील घाेटाळाप्रकरणी आमदार रमेश कदम यांच्या विरोधात मुंबईतील दहिसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला असून काही दिवसांपूर्वी कदम यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला होता. त्याच दिवशी रमेश कदम हे त्यांच्याच माेहाेळ मतदारसंघात पत्रकार परिषद घेत होते. मात्र गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी अटक करायला येत आहेत, हे कळताच कदमांनी धूम ठोकली होती. त्यानंतर कदम सोलापूर, पुणे, पिंपरीतील हाॅटेलमध्ये नाव बदलून राहत होते, अशी बाब चाैकशीदरम्यान उघड झाली.
राष्ट्रवादीला धक्का
विशेष म्हणजे महामंडळाचे पैसे ज्या लोकांना दिले होते त्यांची भेटदेखील या काळात कदम यांनी घेतल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागातल्या अधिकाऱ्यांनी दिव्य मराठीला दिली. रमेश कदम यांची अटक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात असून त्यांच्या पुढील चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता असून त्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतील, अशी शक्यता आहे.