आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच जातीयवाद्यांचा दहशतवाद निषेधार्ह!, संमेलनाध्यक्ष सबनीस यांची भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सारस्वतांचा मेळावा असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शनिवारी पिंपरीतील ग्यानबा-तुकाराम साहित्य नगरीत थाटात उद‌्घाटन झाले. संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस अनेक मुद्द्यांना स्पर्श करत तडाखेबाज भाषण केले.
ग्यानबा-तुकाराम नगरी (पिंपरी ) - "असहिष्णुता एकाच सरकारच्या काळात जन्मते असा इतिहास नसतो. त्यामुळे सत्यावर आधारित इतिहासलेखन व अभिव्यक्ती स्वातंत्र्य वर्तमानात कठीण झाले आहे. दहशतवाद फक्त जागतिक व मुस्लिम संघटनांचाच नाही, तो सर्व जातीयवाद्यांचा आहे. तसाच तो राजकीय दहशतवादसुद्धा आहेच. गल्लीबोळापासून धार्मिक, राजकीय, आर्थिक गुंडांच्या मालिका सुरू होतात. त्यांचा विस्तार जागतिक दहशतवादी स्तरापर्यंत वाढत जातो, हे निषेधार्हच आहे,’ अशी भूमिका ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवारी संमेलनाच्या व्यासपीठावर मांडली.

भारतीय राज्यघटनेला अभिवादन करून डॉ. सबनीसांनी भाषण सुरू केले. डॉ. सबनीस काय बोलणार, याची धास्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांपासून स्वागताध्यक्षांपर्यंत आणि भाजपच्या खासदारांपासून ते रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्यापर्यंत सर्वांनाच होती. सबनीसांच्या भाषणानंतर मात्र सर्वांनीच सुटकेचा सुस्कारा सोडला. सबनीसांच्या भाषणाला श्रोत्यांकडून वरचेवर टाळ्या मिळत गेल्या, हे विशेष. विविध वैचारिक प्रणाल्या, मतप्रवाह, अस्मितांचे मुद्दे एकत्र करून विवेकाच्या पातळीवर सर्वांनी एकत्र येत समन्वयवादी भूमिका घ्यावी, या सूत्राभोवती सबनीसांनी भाषणाची गुंफण केली.

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न नेहमीच समाजाच्या कळीचा प्रश्न बनला आहे,’ असे सांगत सबनीस म्हणाले ‘वर्तमानातल्या लेखकांनी केलेली पुरस्कार वापसी त्यांच्या स्वातंत्र्याचा भाग म्हणून समर्थनीय मानता येते; परंतु या सर्व लेखक-विचारवंतांनी त्यांचे सामर्थ्य ज्या लेखणीत आहे, त्याद्वारे प्रथमत: सरकार आणि समाजाचे प्रबोधन करून संवाद केला असता तर अधिक योग्य झाले असते. लेखकांमधील फूटही टळली असती.’

१२९ पानांचे भाषण
‘सामर्थ्य आणि मर्यादासूत्रावर आधारित संवाद-संघर्षवादी धर्मनिरपेक्ष भूमिका' असे शीर्षक असलेले १२९ पानांचे भाषण सबनीस यांनी लिहून आणले होते. मात्र, उद‌्घाटनाच्या कार्यक्रमास उशीर झाल्याने सबनीसांना पूर्णवेळ भाषण करता आले नाही. मोजक्या मुद्द्यांना स्पर्श करत डॉ. सबनीस यांनी संघर्ष टाळत संवादी जागांवर भर देण्याचा आग्रह धरला.

वर्णव्यवस्था ही प्राचीन असहिष्णुताच
"वर्णव्यवस्था ही प्राचीन असहिष्णुताच आहे. आजची जातव्यवस्थासुद्धा प्रत्येक काळात असहिष्णूच राहिली आहे. मराठवाडा नामांतर असो की आणीबाणी असो, बेलछी असो की शीख हत्याकांड असो, सर्व घटना असहिष्णुतेच्या साक्षी आहेत. एम. एफ. हुसेनची शोकांतिका, तस्लिमा नसरीनच्या सांस्कृतिक कोंडमाऱ्याची सत्यकथा, असीम त्रिवेदीच्या चित्रकलेची मुस्कटदाबी, लोककलावंत गदर यांचे भोगलेपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बोजवारा उडाल्याचीच प्रचिती देतात,' असे सबनीस म्हणाले.

सबनीसांचे प्रहार
- "लोकशाहीचा चौथा खांब मीडिया असेल तर तो शिल्लक आहे का? हा खांब सत्याचा अपलाप करतो का? हा लोकशाहीचा खांब नसून लोकशाहीच्या तिरडीचा दांडा आहे, असा जर सामान्यांचा अनुभव असेल तर पत्रकारांनीही आत्मपरीक्षण केले पाहिजे.
- संपादक-पत्रकारांच्या लेखण्या भांडवलशाहीकडे गहाण पडणे हा तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वात मोठा पराभव आहे.
- विद्रोहाच्या अभिव्यक्तीसाठी शिव्याशापांची पुनरावृत्ती दलित साहित्यिकांच्या किती पिढ्यांनी किती प्रमाणात गिरवावी?
- सत्तेच्या सोईने विचारवंत मत मांडतील अशी अपेक्षा राज्यकर्त्यांनी करू नये.
- पुरोगामी आणि प्रतिगामी, डावे आणि उजवे या दोन्ही परंपरांत असत्य आहे. सत्याचा अपलाप आहे. अभिजनांना माफ करण्याचे कारण नाही. बहुजनांनाही माफ करण्याचे कारण नाही. दोन्हीमध्ये जातीयवाद असेल तर एक जातीयवाद दुसऱ्या जातीयवादाला निर्दोष ठरवू शकत नाही.
- विज्ञानाने जवळ येणारे धर्म, देश, प्रांत काहीसे कोरडेच राहतात. कलाकृतीने जवळ येणारे भावनेच्या व जाणिवेच्या धाग्याने एकात्म होतात.

नथुरामाच्या परंपरेतील मारेकऱ्यांचा निषेध
माउंट अबू येथील कार्यक्रमास जायचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. श्रीपाल सबनीस यांचे भाषण सुरू होण्याआधीच काढता पाय घेतला. सबनीस काय बोलतील याचा अंदाज नसल्याने फडणवीस यांनी सावध पवित्रा घेतल्याची चर्चा यामुळे संमेलनस्थळी रंगली. सबनीस यांनीही पुढे संघ परिवाराला डाचणारे आणि सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवणारे वक्तव्य केले. ते म्हणाले, "आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्याप्रति सहवेदना प्रकट करीत असतानाच विवेकाची व सत्याची पेरणी करत असताना ज्यांना गोळ्या घातल्या गेल्या त्या डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी या हुतात्म्यांचे पुण्यस्मरण करून नथुरामाच्या परंपरेतील मारेकऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो.'

महापुरुषांना देव बनवू नका
खुद्द महापुरुष स्वत:ला साधन मानत असताना अनुयायी मात्र महापुरुषांना साध्य का मानतात? उदात्तीकरण करून महापुरुषांना देवत्व का बहाल करीत आहेत. महापुरुषांच्या अस्मिता अहंकारात रमल्याने समाज व संस्कृती दुभंगत आहे. तेव्हा महापुरुषांना महापुरुषच राहू द्यावे. त्यांना देव करू नये आणि वाटणीही करू नये. जात- धर्मांच्या चौकटीत बसवू नये. महापुरुषांची वजाबाकी ऐक्यासाठी धोक्याची आहे,’ असे डाॅ.सबनीस म्हणाले.