आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरी भागांत मतदानाचा टक्का वाढवण्याचे सर्वच राजकीय पक्षांसमाेर अाव्हान; ‘नोटा’चीही धास्ती (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मुंबई- पुण्यासह राज्यातील दहा महापालिकांसाठी मंगळवारी (ता. २१) शहरी मतदारांकडून जास्तीत जास्त मतदान करवून घेण्याचे सर्वच राजकीय पक्षांसमाेर अाव्हान असेल. पाच वर्षांपूर्वी (२०१२ मध्ये) यापैकी एकाही शहरातील मतदानाची सरासरी टक्केवारी ५८ च्या पुढे गेली नव्हती. उल्हासनगरमध्ये तर सर्वात नीचांकी ४२.१९ टक्के तर नाशिकमध्ये उच्चांकी ५७.१९ टक्के मतदान झाले होते.   

दहा प्रमुख महापालिकांमधल्या एकूण मतदारांची संख्या १ कोटी ९५ लाख ३७ हजार १९६ एवढी मोठी आहे. राज्यातल्या २८८ पैकी ७२ आमदार आणि ४८ पैकी १६ खासदार या दहा शहरांमधून निवडून येतात. विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक अडीच वर्षांवर येऊन ठेपली असल्याने या आमदार-खासदारांसाठीही महापालिकेची निवडणूक रंगीत तालीम असणार आहे.  

मुंबई, ठाणे, उल्हासनगर (शिवसेना), पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती (राष्ट्रवादी काँग्रेस), नाशिक (मनसे), सोलापूर (काँग्रेस) असे आठ महापालिकांमधले सध्याचे चित्र आहे. अकोला आणि नागपूर या दोनच महापालिका सत्ताधारी भाजपकडे आहेत.
 
नुकत्याच झालेल्या नगराध्यक्ष निवडीत भाजपने राज्यात बाजी मारली होती. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. गेल्या दोन आठवड्यांमधील प्रचाराची रणधुमाळी पाहता महापालिकांमधली चुरस शिगेला पोचल्याचे दिसले आहे. सर्वच राजकीय पक्षांसाठी या दहा महापालिकांमधली सत्ता राखण्याचे आव्हान आहे.  

शहराचे कारभारी म्हणून सूत्रे हाती घेणाऱ्या पक्षांना अत्यंत तोकड्या जनमताचा पाठिंबा मिळत असल्याचे सन २०१२ च्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. मुंबईत शिवसेनेला फक्त २१.८५ टक्के मते मिळाली होती. ठाणे, उल्हासनगरमध्ये शिवसेनेला मिळालेली मते अनुक्रमे २९.५१ आणि १७.०३ टक्के होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सत्ताधारी असलेल्या ‘राष्ट्रवादी’ला गेल्या निवडणुकीत अनुक्रमे २५.१२ आणि ३९.४६ टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला.
 
पहिल्यांदाच नाशिक जिंकलेल्या मनसेला २८.२४ टक्के मते मिळाली होती. सोलापूरमध्ये ३३.३० टक्के मते मिळवून काँग्रेस सत्तेत आली. जेमतेम १८.४२ टक्के मते मिळवून ‘राष्ट्रवादी’ने अमरावती जिंकली. नागपुरात भाजपला २९.६८ टक्के मते मिळवता आली. केवळ १४.७० टक्के मते मिळवून भाजपने अकोल्याचे महापौरपद मिळवले हाेते.  
 
‘नोटा’चा वापर  
‘नोटा’ (नन ऑफ द अबाॅव्ह) म्हणजेच ‘वरीलपैकी एकही नाही’ हा पर्याय देणारे बटण व्होटिंग मशीनवरील सर्वात शेवटी असणार आहे. ‘नोटा’खाली दिलेले मत मोजणीत धरले जात नाही. ‘नोटा’ला उमेदवार निवडीची किंमत म्हणजेच ‘इलेक्टोरल व्हॅल्यू’ नाही. 
 
उदाहरणार्थ शंभरपैकी ९९ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला असेल तर उर्वरित एक मत ज्या उमेदवाराला मिळते तो उमेदवार विजयी घोषित केला जातो. मग ‘नोटा’चा उपयोग काय, असा प्रश्न पडू शकतो. ‘नोटा’मुळे विविध राजकीय पक्षांनी दिलेले उमेदवार नाकारण्याचा अधिकार मतदारांना मिळतो. शिवाय, मतदारांची संख्या वाढल्याने बोगस मतदानाच्या प्रमाणात घट येते.
बातम्या आणखी आहेत...