आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे, पिंपरी-चिंचवडमधला ‘टक्का’ वाढला, वेळ संपताना गर्दी वाढल्याने रात्री अाठपर्यंत चालले मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मतदानाची टक्केवारी मंगळवारी काही अंशाने वाढली आहे. निवडणूक अायाेगाच्या प्राथमिक अंदाजानुसार, पुणे मनपात ५४ टक्के तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६७ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात अाले.  मतदान संपण्याची वेळ जवळ आली असताना अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याने रात्री आठनंतरही काही ठिकाणी मतदान सुरू राहिले. दरम्यान, सन २०१२ च्या तुलनेत यंदाच्या मतदानात अंशतः वाढ होणार असल्याचे संकेत यामुळे मिळाले आहेत. गेल्या खेपेला पुण्यात ५०.९२ टक्के तर पिंपरी-चिंचवडमध्ये ५४.८७ टक्के मतदान झाले होते.
 
पुण्यात १६२ नगरसेवकांची निवड २६ लाख ३७ हजार ४५३3 मतदारांना करायची होती. पिंपरी-चिंचवडमधून १२८ नगरसेवक निवडून येणार आहेत. यासाठी ११ लाख ९२ हजार ८९ मतदार होते. सकाळच्या टप्प्यात मतदानाचा वेग अधिक होता. सोसायट्यांच्या भागात मतदारांनी रांगा लावल्याचे दिसले. दुपारी बारानंतर दोन्ही शहरात मतदान मंदावले. त्यामुळे धास्तावलेल्या उमेदवारांना मतदान वाढवण्यासाठी पळापळ करावी लागली. 
 
मतदानाची वेळ संपल्यानंतरही केंद्रांवरील रांगामध्ये उभ्या असलेल्यांना मतदानाची संधी देण्यात आली. पहिल्या चार तासांत पुण्यात १९.५० टक्के तर पिंपरी-चिंचवडमध्ये २०.७३ टक्के मतदान झाले होते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील बिघाडामुळे उशीर होणे, एका प्रभागातील चार उमेदवारांपुढील चिन्हाचे बटण दाबण्याचे बंधन आदी कारणांमुळे मतदानास वेळ लागत होता. क्वचित ठिकाणी यंत्रावरील ठराविक बटण दाबून निवडणूक अधिकारीच विशिष्ट पक्षाला मदत करत असल्याचा अाराेप  करण्यात अाला.
 
जि.प.ला 70 % मतदान
पुणे जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठी आणि जिल्ह्यातल्या १३ पंचायत समित्यांच्या १५० गणांसाठीही मंगळवारी सकाळी साडेसातला मतदान सुरू झाले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांमध्ये अधिक उत्साह असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातल्या सुमारे २८ लाख मतदार मतदान करणार होते. दुपारी साडेतीन वाजेपर्यंतच ५१.५५  टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. संध्याकाळी गेल्यावर्षी ६४  टक्के मतदान झाले होते. दुपारी चारनंतर मतदारांच्या रांगा लागल्या हाेत्या. अायाेगाच्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे जिल्हा परिषदेसाठी सरासरी ७० टक्के मतदानाची नाेंद झाली.
 
 क्षणचित्रे 
-प्रचार मुदत संपल्यानंतरही सोशल मीडियातून प्रचार केल्याचा पिंपरीतील ७६ उमेदवारांवर निवडणूक आयोगाचा ठपका.  

-पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे आणि माजी उपमहापौर बंडू गायकवाड या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनची आरती ओवाळून पूजा केल्याचा प्रकार घडला.
 
-पिंपरीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यात हाणामारी झाली. 
- मतदार याद्यांमध्ये घोळ आणि मतदारांना स्लिपा वाटप न होण्याच्या प्रकारांमुळे दोन्ही शहरांत अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले.
 
बारामतीतील अादर्श केंद्रांमुळे मतदार प्रभावित
मतदारांच्या स्वागतासाठी सुबक रांगेाळ्या, केळीचे खुंट, नारळांच्या पानांची स्वागत कमान... मतदानासाठी येणाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत... साेबतीला सुमधूर मंगल गीते... हे वातावरण एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात नसून चक्क बारामती तालुक्यातील मतदान केंद्रावर मतदारांना अनुभवास मिळाले. सुपेकर आणि काटेवाडी या अादर्श मतदान केंद्रांवर अालेला हा अनुभव पाहून मतदार अक्षरश: भारावून गेले. काटेवाडी ७०.४० टक्के तर सुपा येथे ७२.१६ टक्के मतदान झाले.
 
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बारामती तालुक्यात २० आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.  सुपा मतदान केंद्र ‘पोपटी’ तर काटेवाडी मतदान केंद्र ‘गुलाबी’ रंगाच्या वस्तू वापरून सुशाेभित करण्यात अाले हाेते. मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षासह चार महिलांची नियुक्ती केली हाेती. सर्व कर्मचारी मतदान केंद्राने निवडलेल्या रंगसंगतीचा पोशाख परिधान करुन मतदारांचे स्वागत करत हाेते. 
 
हे दाेन्ही  केंद्र आदर्श केंद्र करण्यासाठी गटविकास अधिकारी प्रमोद काळे, भूमी अभिलेख उपाधिक्षक अमरसिंह पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता व्ही. एम ओहळ, क्षेत्रिय अधिकारी कृषिमंडल अधिकारी राजेंद्र शितोळे, शाखा अभियंता जयंत काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
बातम्या आणखी आहेत...