आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालख्या सासवड, लोणी काळभोर मुक्कामी, आता ओढ केवळ विठ्ठल दर्शनाची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘काही न मागती देवा, त्यांची करू धावे सेवा..’ असे म्हणत दोन दिवस वारकऱ्यांच्या सेवेत रमलेल्या  पुणेकरांचा निरोप घेत मंगळवारी सकाळी पुढील प्रवासासाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या  पालखी सोहळ्याने रात्री उशिरा अनुक्रमे सासवड आणि लोणी काळभोरच्या मुक्कामाच्या  जागा गाठल्या.   
 
पुण्यातून प्रथम माउलींच्या पालखी सोहळ्याने हडपसरमार्गे दिवे घाटाच्या दिशेने सासवडकडे, तर तुकोबांच्या पालखी सोहळ्याने हडपसरमार्गे लोणी काळभोरच्या  दिशेने प्रयाण केले. त्यातही माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी दिवे घाटाची अवघड चढण आव्हानात्मक असते. शिवाय चालण्याचा  पल्लाही वारी मार्गावरील सर्वात अधिक चालीचा असतो. हे २७ किलोमीटरचे अंतर आणि दिवे घाटाचा चढणमार्ग पालखी आणि वारकरी दोघांसाठी परीक्षा पाहणारा असतो. मात्र, हरिनामाचा, माउलींच्या नावाचा जयघोष करत लक्षावधी भाविकांनी ही चढण लीलया पार केली.  
स्वच्छता दिंडीही पालखीसाेबत
राज्य सरकारचा स्वच्छ भारत संदेश अधिकाधिक जनतेपर्यंत नेण्यासाठी वारी सोहळ्यात मंगळवारी स्वच्छता दिंडीही रवाना करण्यात आली. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत ही दिंडी मार्गस्थ झाली. वारीदरम्यान वारकऱ्यांमध्ये आणि वाटेतील सर्व गावांमध्ये ही दिंडी स्वच्छतेचा संदेश देणार आहे. या वेळी ग्रामसभा दिंडीही मार्गस्थ झाली. 
 
दगडूशेठ मंडळातर्फे रुग्णवाहिका   
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंडळ, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या  वतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधून दोन्ही पालख्यांसोबत  चार सुसज्ज रुग्णवाहिका आणि वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांचा चमू रवाना करण्यात आला. पंढरपूर येथे वारीची सांगता होईपर्यंत हे पथक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्यसेवा देणार आहे.  
 
वारकऱ्यांसह इफ्तार  
साखळीपीर मंदिर आणि दि मुस्लिम वेल्फेअर ट्रस्टतर्फे मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांसह एकत्रित रमजान महिन्याचा उपवास सोडला. अनेक वारकऱ्यांनी मुस्लिम बांधवांसह एकत्रित येऊन संवाद साधला व भेटीचा आनंद साजरा केला.  
 
फक्त धार्मिक अधिष्ठान सरले  
वारीचा हेतू आध्यात्मिक  उन्नतीचा असला तरी नव्या काळात वारीला समकालीन संदर्भही जोडले गेले आहेत. निर्मल वारी, हरित वारी, प्रदूषणमुक्त वारी, ‘ती’ची वारी.. असे अनेक उपक्रम वारीत सहभागी झाले अाहेत.   
 
भोजन, चहा, नाष्ट्याचीही साेय
शहरातील अनेक ठिकाणी थकलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा सुरू आहे. तेल लावून गुडघे, पोटऱ्या, तळवे, बोटे यांना शास्त्रशुद्ध  मालिश  किंवा मसाज करण्यात येत आहे. तरुणाई यात आघाडीवर आहे. काही ठिकाणी ज्येष्ठ वारकऱ्यांना हेडमसाज देण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक मंदिरात वारकऱ्यांसाठी भोजन, चहा, नाष्टा, फलाहार आणि पाणपोया उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वारीतील वाहनांची संख्या मोठी आहे, परंतु वाहनतळही मोफत करण्यात आले आहेत. मोठ्या सोसायट्यांमध्ये एकत्रित स्वरूपात सोसायटीच्या आवारात मंडप घालून वारकऱ्यांसाठी भोजनादी सोयी केल्या आहेत.  
 
सर्व धर्म समभाव...
साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने सालाबाद प्रमाणे पांडुरंगाच्या प्रसादाने, भजनाच्या गजरात, सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत मुस्लिमांचा रोजा ईफतारचा कार्यक्रम करण्यात आला. या वेळी सर्व धर्म ग्रंथांचे पुजन व सोबत राष्ट्र ग्रंथ संविधानाचेही पुजन करण्यात आले.
 
हेही वाचा...
बातम्या आणखी आहेत...