आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE : ‘विद्येच्या माहेरघरा’त परदेशी विद्यार्थी घटले, अफगाणिस्तानचे सर्वाधिक विद्यार्थी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पुणे - अनेक नामांकित शिक्षण संस्था व दर्जेदार शिक्षण संस्थांमुळे पुणे शहराला देशभरात विद्येचे माहेरघर म्हणून संबाेधले जाते. पुण्यातील वेगवेगळ्या संस्थेत दरवर्षी माेठ्या प्रमाणात परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल हाेतात व त्यानुसार परदेशी चलनही भारताला मिळत असते. मात्र, यंदाच्या वर्षी परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून यंदाच्या वर्षी शिक्षण घेण्याकरिता केवळ एक हजार ५८ परदेशी विद्यार्थी पुण्यात दाखल झाले अाहेत. पुणे पाेलिसांच्या फाॅरेन रजिस्ट्रेशन अाॅफिसकडील (एफअारअाे) अाकडेवारीवरून हे समाेर अाले अाहे.  
 
पुण्यातील दर्जेदार शिक्षण, चांगल्या प्रकारचे प्राध्यापक, सुरक्षित ठिकाण, कमी खर्चातील शिक्षण व्यवस्था, उत्तम ग्रंथालय, निवासाकरिता याेग्य वसतिगृह व फ्लॅट, विविध विषयांकरिता तज्ज्ञांची उपलब्धता यामुळे अनेक परदेशी विद्यार्थी पुण्याकडे अाकर्षित हाेत असतात. मात्र, मागील तीन वर्षांपासून परदेशी विद्यार्थ्यांत घट सुरू झाली असून यंदाच्या वर्षी ती लक्षणीयरीत्या कमी झाली अाहे. सन २०१४ मध्ये तीन हजार ८८० परदेशी विद्यार्थी शिक्षणाकरिता पुण्यात दाखल झाले. २०१५ मध्ये सदर संख्येत घट हाेऊन तीन हजार २८१ विद्यार्थी, तर  २०१६ मध्ये दाेन हजार ६३६ विद्यार्थ्यांनी पुण्यातील वेगवेगळ्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेतले. यंदाच्या वर्षी ३१ जुलैपर्यंत केवळ एक हजार ५८ परदेशी विद्यार्थी पुण्यात अाले अाहेत. अाॅगस्ट महिन्यात ती वाढण्याची शक्यता नाही. सुमारे १६०० परदेशी विद्यार्थी मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.  
 
पुण्यात गेल्या काही वर्षात निवास व्यवस्था, प्रवास व इतर कारणांचे खर्च वाढला अाहे. तेवढ्यात खर्चात बंगळुरू, दिल्लीतही शिक्षण घेणे शक्य हाेत असल्याने परदेशी विद्यार्थी या शहरांना प्राधान्य देत असल्याचे दिसते.
 
अफगाणिस्तानचे सर्वाधिक विद्यार्थी  
‘एफअारअाे’च्या पाेलिस उपायुक्त ज्याेती प्रिया सिंग ‘दिव्य मराठी’शी बाेलताना म्हणाल्या, मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी परदेशी विद्यार्थ्यांची नाेंदणी कमी झाली असून पुणे शहर वगळता इतर शहरांमध्येही सदर विद्यार्थी शिक्षणाकरिता गेले असावेत. यंदाच्या वर्षी पुण्यात शिक्षणासाठी अालेल्या विद्यार्थ्यांत सर्वाधिक परदेशी विद्यार्थी अफगाणिस्तानचे (४७९) असून त्यानंतर इराक (६४), येमेन (५६), इराण (४६), बहरीन (४६) या देशातील विद्यार्थी पुण्यात दाखल झाले अाहेत. तसेच बांगलादेश, रिपब्लिक अाॅफ काेरिया, थायलंड, युनायटेड स्टेट्स या देशांतीलही विद्यार्थी पुण्यात माेठ्या प्रमाणात शिक्षणाकरिता येत अाहेत. रिसर्चकरिता पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प असून मागील तीन वर्षांत सुमारे २०० विद्यार्थीच अालेले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...