आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘क्वीन मेरी’ संस्थेची ब्रिटिशकालीन अाेळख बदलणार, सध्या 210 जवान घेताहेत प्रशिक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - देशाचे रक्षण करत असताना अनेक सैनिकांना कायमचे अपंगत्व येत असते. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त हाेत असते. अशा सैनिकांना पुन्हा जगण्याची उमेद देण्यासाठी भारतातील एकमेव संस्था ‘क्वीन मेरी अाैद्याेगिक प्रशिक्षण संस्था’(क्यूएमटीअाय) पुण्यात कार्यरत अाहे. यंदा ही संस्था शताब्दी वर्ष साजरे करत असून संस्थेचे ब्रिटिशकालीन बिरूद काढून भारतीय नाव करण्याचा याेजनेचा प्रस्ताव अाहे, अशी माहिती संस्थेचे प्रशिक्षण विभागाचे डीन लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) पंजाबराव देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली अाहे.   
पहिल्या महायुद्धात सुमारे ६५ हजार भारतीय सैनिक मारले गेले तर ७० हजारांवर गंभीर जखमी झाले.  युराेपमधून हे सैन्य मुंबर्इ बंदरात परतल्यानंतर त्यांची अवस्था पाहून तत्कालीन मुंबर्इ राज्याचे गव्हर्नर लाॅर्ड विलिंग्डन यांची पत्नी मेरी विलिंग्डन यांनी पुढाकार घेत अशा जवानांसाठी १६ मे १९१७ राेजी मुंबर्इत सदर संस्थेची स्थापना केली. त्यासाठी १० लाखांची मदत दिली. १९१८ मध्ये  इंग्लंडची राणी क्वीन मेरी यांनीही १० लाखांचे अर्थसाह्य दिले. त्यामुळे सदर संस्थेचे नाव ‘क्वीन मेरी’ असे ठेवण्यात अाले. त्यानंतर १९२२ मध्ये ही संस्था  पुण्यात अाणली. ‘अपंग सैनिकांच्या सन्मानपूर्वक पुनर्वसनासाठी अाैद्याेगिक प्रशिक्षण देणे’ असा या संस्थेचा उद्देश असून या संस्थेत एक व दाेन वर्षांचे काेर्सेस चालवले जातात. यामध्ये मॅनेजमेंट, संगणक व इलेक्ट्रिशियन, फिटर, डिझेल मेकॅनिक, काॅम्प्युटर अाॅपरेटर, काॅम्प्युटर हार्डवेअर रिपेअरिंग यांचा समावेश अाहे. तसेच  जवानांच्या सर्वांगीण विकासासाठी व व्यवसाय काैशल्य क्षमता वाढविण्यासाठी संगणक प्रशिक्षण (एमएस-सीअायटी), इंग्रजीचे मूळ व्यावहारिक शिक्षण तसेच मानसिक कुशलताही (साॅफ्ट स्किल) शिकवले जाते.  
 
अानंदी जीवन जगण्याचा प्रयत्न  
उस्मानाबाद जिल्ह्यातील दहिफळ गावाचे हवालदार बाबा अंगरखे हेही या संस्थेत प्रशिक्षण घेत अाहेत. ‘महार रेजिमेंटमध्ये मी सध्या कार्यरत अाहे. २ अाॅगस्ट २००१ राेजी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात माझ्या उजव्या पायात गाेळी लागली व मी अधू झालाे. माझ्यावर पत्नी, दाेन मुली व एक मुलाची जबाबदारी असून मुलांना उच्चशिक्षण देण्यासाठी मी अजूनही मेहनत करत अाहे. शारीरिक अपंगत्व अाले तरी पुढील अायुष्य अानंदी जगण्याचा प्रयत्न मी करत अाहे.
 
सध्या २१० जवान घेताहेत प्रशिक्षण
मागील तीन वर्षांत सुमारे ४५० जवानांनी याठिकाणी अाैद्याेगिक प्रशिक्षण घेतले असून सध्या २१० जवान प्रशिक्षण घेत अाहेत. तीनशे जवानांच्या निवासाची व्यवस्था या ठिकाणी असून पुढील तीन वर्षांत ही संख्या ५०० पर्यंत नेण्याचा मानस अाहे. भविष्यात काही प्रशिक्षण काेर्सही सुरू केलेे जातील.  सदर संस्था अशासकीय असल्याने त्यास नागरिकांकडून अर्थसाह्यही केले जाते, अशी माहिती डीन पंजाबराव देशमुख यांनी दिली.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...