आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच दिवसांत राज्यात पडणार चांगला पाऊस, नंतर घेणार अल्प विश्रांती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - येत्या पाच दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यात जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून बरसणारा मान्सून सध्या चांगलाच सक्रिय असून येत्या आठवड्याच्या अखेरीस मात्र तो मंदावण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

सध्या मध्य प्रदेशसह उत्तर भारतात जोरदार पाऊस सुरू असून भोपाळसह राज्याच्या बहुतेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. ईशान्य मध्य प्रदेश आणि लगतच्या भागावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा पाऊस पडत असून हे क्षेत्र आता विरत असल्याने महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते, असे आयएमडीने म्हटले आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. येत्या ४८ तासांत विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, मात्र उर्वरित ठिकाणी पाऊस अल्प विश्रांती घेण्याचा अंदाज आहे, असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार येत्या पाच दिवसांत उत्तर कोकण, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांत येत्या पाच दिवसांत चांगला पाऊस पडेल. दरम्यान, १ जून ते ६ जुलैदरम्यान राज्यभराचे पावसाचे चित्र समाधानकारक असल्याने कृषी क्षेत्राला दिलासा मिळाला असून राज्यात सुमारे ६० टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, असे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी सांगितले.

खडकवासला निम्मे भरले
पुण्याजवळच्या खडकवासला धरणात ५०.६३ टक्के पाणीसाठा झाला आहे. या धरणसाखळीतील टेमघर १२.८३, वरसगाव २०.१५, पानशेत २८.५९ टक्के असे साठ्याचे प्रमाण आहे.
धरणांत धिम्या गतीने आवक
पावसाचा जोर कमी असला तरी पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस् सुरू असल्याने राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा धिम्या गतीने वाढत आहे. कोयना धरण १९.८९ टक्के, राधानगरी धरण ३८.३४ टक्के भरले आहे. उरमोडी धरणात ३९.७८ टक्के साठा जमा झाला आहे. भीमा खोऱ्यात कलमोडी धरणात सर्वाधिक ४९.४७ टक्के पाणीसाठा आहे. मराठवाड्यात धरणांतील पाणीसाठा जेमतेम असून विदर्भात मात्र मुसळधार पावसाने धरणे भरू लागली आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...