आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी पुस्तकांच्या दुनियेत रमले राज ठाकरे, \"अक्षरधारा\' दुकानातून केली मराठी पुस्तकांची खरेदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- एरवी पक्षाच्या कामकाजात व्यग्र असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी सायंकाळी आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत पुस्तकांच्या गर्दीत रमल्याचे पुण्यात पाहण्यास मिळाले.

कार्यकर्त्यांची नेहमीची अलोट गर्दी टाळत गुरुवारी राज मोजक्या मित्रांसमवेत बाजीराव रस्त्यावरील "अक्षरधारा' या पुस्तकांच्या दुकानात आले. या वेळी त्यांनी मराठी पुस्तकांची खरेदी केली. शिवाय काही पुस्तके मागवण्यासही सांगितले. जवळपास तासभर पुस्तकांच्या संगतीत घालवेपर्यंत राज ठाकरे आल्याची बातमी पसरली आणि दुकानाबाहेर प्रचंड गर्दी गोळा होऊ लागली. ते पाहून राज यांनी काढता पाय घेतला.

दुकानात नव्याने सुरू झालेल्या इंग्रजी पुस्तकांच्या दालनाची माहिती दिली असता त्याकडे दुर्लक्ष करून राज फक्त मराठी पुस्तकांमध्येच रमले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नव्याने उजेडात आलेल्या पत्रव्यवहाराची पुस्तके नुकतीच बाजारात आली आहेत. ती ठाकरे यांनी आवर्जून खरेदी केली. कथा, कादंबरी, कविता आदी साहित्याऐवजी ऐतिहासिक पुस्तकांच्या खरेदीवर त्यांचा भर होता. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात प्रचंड गाजलेले अनिल बर्वे यांचे "थँक्यू मिस्टर ग्लाड’ या पुस्तकाची ठाकरे यांनी मागणी केली. हे पुस्तक मुंबईतसुद्धा उपलब्ध झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांना हे पुस्तक पुण्यातही मिळाले नाही. तेव्हा त्यांनी पुस्तकाची मागणी नोंदवून ठेवली.

स्पिलबर्ग आला तरी...
"एफटीआयआय"मधल्या आंदोलनाबाबत मला बोलायचे नाही. कोण तो गजेंद्र चौहान का कोण त्याच्यापेक्षा संस्था महत्त्वाची. अनेक गजेंद्र येतील आणि जातील, संस्थेचे काय? चौहानपेक्षा संस्था महत्त्वाची आहे. ती जपली पाहिजे. संस्थेचा कारभार योग्य पद्धतीने चालतो का ते महत्त्वाचे. संस्थेचीच स्थिती वाईट असेल, तर स्टीव्हन स्पिलबर्गलाही येथे आणून बसवले तरी काय फरक पडणार आहे? प्रत्येक प्रश्नातच राजकारण आणणे हा फालतूपणा आहे.’
- राज ठाकरे, प्रमुख मनसे

"पुलं’चे पत्र
मुंबईतले सांस्कृतिक जीवन, मराठी यासंदर्भात अपेक्षा व्यक्त करणारे पत्र पु. ल. देशपांडे यांनी मुंबई मनपा आयुक्तांना लिहिले होते. हे पत्र प्रसिद्ध झाले आहे का, याची चौकशी ठाकरे यांनी केली. परचुरे प्रकाशनाच्या पुस्तकात हे पत्र छापले असल्याचे त्यांना सांगण्यात आले. हे पुस्तक पाठवून देण्याचे ठाकरे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...