आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमापात्रात अवैध वाळू उपसा करताना ८२ ट्रक ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्कलकोट- अक्कलकोट तालुक्यातील आळगी परिसरात भीमा नदीच्या पात्रातील अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या ८४ मालट्रक, टिपर, हायवा इत्यादी वाहने आणि ८ जेसीबी मशीन या वाहनांसह २९ चालकांना शनिवारी मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले. ८४ पैकी ३२ ट्रकमध्ये वाळू भरलेली होती तर अन्य ट्रक वाळू भरण्याच्या तयारीत होते. त्यावेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या पथकाने कारवाई केली.

सोलापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक विरेश प्रभू यांना अवैध वाळू उपशाची माहिती मिळताच त्यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना विशेष पथकासह घटनास्थळी कारवाईसाठी पाठवले. त्यानुसार पथकासह ते आळगी (ता.अक्कलकोट) येथील भीमा नदीच्या परिसरात दाखल झाले. या वेळी पात्रातून मोठया प्रमाणावर बेकायदा वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्याने उपाध्याय यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे,अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे आणि वळसंग पोलीस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची अधिक कुमक मागवून ८४ मालट्रक, ८ जेसीबी मशीन आणि २९ चालकांना ताब्यात घेतले.

महसूल विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना बोलावून ट्रकच्या मालकीसंदर्भात माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.