आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदारकी देऊन मुख्यमंत्र्यांनी शाहू महाराजांचा वंश बाटवला, गायकवाड यांचा शेकापमध्ये प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘राष्ट्रपती नियुक्त खासदारकी घेण्यापेक्षा रस्त्यावर उतरून लढायला पाहिजे होते. छत्रपतींच्या वंशजामुळे आशा निर्माण झाली होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी खासदारकी देऊन शाहूंचा वंश बाटवला,’ अशी टीका संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी खासदार युवराज संभाजीराजे यांचे नाव न घेता केली. शाहूंचा वंश बाटवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे ‘काउंटडाऊन’ सुरू झाले आहे. पुढची सत्ता लाल बावट्याची असेल, असे ते म्हणाले.  

गायकवाड यांनी गुरुवारी शेतकरी कामगार पक्षात (शेकाप) केला. त्यांच्यासोबत संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, अखिल भारतीय मराठा महासंघ, शिवराज्य पार्टी, शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रसेवा समूह आदी संघटनांतल्या कार्यकर्त्यांनीही शेकापमध्ये प्रवेश केला. यानिमित्ताने शनिवार वाड्यावर झालेल्या मेळाव्यात गायकवाड बोलत होते.  गायकवाड म्हणाले, ‘सत्तेवर येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले अाणि सत्तेवर आल्यावर ते शक्य नसल्याचे ते सांगतात. धनगर, मराठा आरक्षणाचे आश्वासन दिले. मराठा आरक्षण आता कोर्टात आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवस्मारकाची घोषणा केली. शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे वातावरण आहे. यावर योग्य निर्णय न झाल्यास एवढे लोक मंत्रालयात घेऊन जाऊ की सरकारला पळती भुई थोडी होईल,’ असा इशाराही त्यांनी दिला.  

अामदार गणपतराव देशमुख यांनी सांगितले की, ‘शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्याची मागणी सर्वात पहिल्यांदा शेकापने केली. दुर्दैवाने हाच महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यांमध्ये आघाडीवर आहे. मी पन्नास वर्षे विधानसभेत आणि बाहेर शेतकऱ्यांसाठी लढत राहिलो. एक ना एक दिवस शेतकऱ्यांचे राज्य यावे यासाठी संघर्ष करत राहिलो. परिवर्तनाची ही लढाई पुढेही सुरू राहिली पाहिजे.’  
 
राजू शेट्टी, राज ठाकरेंवर टीका  
‘शरद जोशी भाजपमध्ये गेले म्हणून काहींनी ‘स्वाभिमान’ दाखवला. पण ते स्वतः ‘स्वाभिमान’ गहाण टाकून सत्तेत जाऊन बसले. आता शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून सत्ता सोडणार का,’ असा प्रश्न गायकवाड यांनी राजू शेट्टी यांचे नाव न घेता उपस्थित केला. ‘संभाजी महाराज मोगलांना मिळाले होते,’ असे वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंना उद्देशून ते म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरेंना विचारले असता तेही म्हणाले होते की ‘हा’  बहुधा नागपूरकरांना फितूर झाला. तुमचाही इतिहास फंदफितुरीचा आहे.’