देहू (पुणे)- महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा म्हणून ओळखल्या जाणारा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उ्दया पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. या पालखी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर वारकरी देहू आणि आळंदीमध्ये दाखल होण्यासाठी सुरवात झाली आहे.
संत तुकाराम महाराज पालखी उद्यापासून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्याची लगबग सध्या देहु परिसरात पाहायला मिळत आहे. देहू मंदिरातील कामांना वेग आलेला असून पालखी सोहळयासाठी देहु नगरी भाविकांच्या गर्दीने दुमदुमली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीला आणि रथाला चकाकी देणे, तंबूची दुरूस्ती, दर्शन बारी, पालखी मार्ग सफाई, डागडुजी, परिसर स्वच्छता, मंदिर परिसरातील विद्युत व्यवस्था, क्लोज सर्किट टीव्ही यंत्रणा, सोहळ्याच्या दरम्यान लागणाऱ्या मदतीसाठी विविध शासकीय कार्यालयांशी व विविध सेवाभावी संस्थांशी प्रत्यक्ष भेटी तसेच पत्रव्यवहार पूर्ण करण्यात येत आहे.
प्रवासात कोणतीही समस्या उद्भवणार नाही याची दक्षता देवस्थानचे विश्वस्त व प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने पालखी रथात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमरे आणि जीपीएस यंत्रणेच्या दुरूस्ती करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होण्यास सुरुवात झाल्याने देहू आणि आळंदी परिसरात पालखी सोहळ्याच्या लगबगीला सुरवात झाली आहे.