पुणे - वैष्णवांची मांदीआळी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणाऱ्या पालखी सोहळ्यात संत तुकाराम महाराज पालखी वाहून नेण्यासाठी यंदा सर्जा-राजा आणि माणिक-राजा या तगड्या बैलजोडीची निवड करण्यात आली आहे. १६ जूनपासून सुरू होणाऱ्या पालखी सोहळ्यात या बैलजोड्या सेवा बजावणार आहेत. पुणे जिल्ह्यातील लोहगाव आणि खेड तालुक्यातील चिंबळी येथील शेतकऱ्यांच्या या दोन्ही बैलजोड्या आहेत.
सोहळाप्रमुख अभिजीत मोरे यासंदर्भात म्हणाले,“दरवर्षी श्रीक्षेत्र देहू संस्थानकडे सेवेचा मान मिळावा, यासाठी बैलजोडी मालकांकडून अर्ज येतात. त्यांची छाननी करून निवड समिती प्रत्यक्ष भेट देऊन बैलजोड्यांची पाहणी करते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते आणि तगडी, रूबाबदार बैलजोडी पालखी सोहळ्यासाठी निवडली जाते. तुकोबांच्या पालखीसेवेचा मान मिळावा, यासाठी यंदा पुणे जिल्ह्यातून १७ आणि सातारा जिल्ह्यातून एक, असे अठरा अर्ज संस्थानकडे आले होते. त्यातून सर्जा-राजा आणि माणिक–राजा अशा दोन बैलजोड्यांची निवड करण्यात आली आहे,”.
लोहगाव येथील भानुदास भगवान खांदवे यांची सर्जा-राजा नावांची बैलजोडी आणि खेड तालुक्यातील चिंबळी येथील अप्पासाहेब महादू लोखंडे यांची माइक – राजा ही बैलजोडी तुकोबांच्या पालखी रथाचा भार वाहणार आहे. प्रगतीशील शेतकरी अशी ओळख असणारे लोहगावचे खांदवे सेवेच्या मानासाठी गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्नशील होते. सर्जा-राजा ही त्यांची बैलजोडी सुमारे तीन लाख रुपयांची असल्याची माहिती आहे. लोखंडे यांच्या घरात वारीची परंपरा आहे. पशुधनही मोठे आहे. तेही सेवेच्या मानासाठी प्रयत्न करत होते. त्यांची माणिक–राजा ही बैलजोडी कर्नाटकमधून खरेदी केली आहे.
निवडीचे निकष काय?
बैलांचा रंग, रूबाबदारपणा, वशिंड, शिंग, शेपूट, डोळे, नखे, चाल, शारीर ठेवण, आरोग्यसंपन्नता यांची पाहणी केली जाते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा दाखला महत्त्वाचा असतो. बैलाची भार वाहून नेण्याची क्षमता आजमावली जाते. तसेच बैलाचा स्वभाव पाहिला जातो. संपूर्ण वारीमार्गात बैलजोडी सतत गर्दीतून वाटचाल करत असल्याने शांत स्वभावाची बैलजोडी निवडली जाते.
अशा आहेत बैलजोड्या...
उंची सुमारे सहा फूट (वशिंडापर्यंत), वजन साडेपाचशे ते सहाशे किलो, रंग -शुभ्र पांढरा, गोलाकार किंवा उंच शिंगे, काळ्या केसांची झुबकेदार लांब शेपूट, गरीब मवाळ शांत स्वभाव.
असा असतो खुराक...
बैलजोड्यांना पहाटे सहा वाजता मका, गहू, हरभऱ्याचा भरडा दिला जातो. त्यानंतर अकरा ते बाराच्या दरम्यान गव्हाचे पीठ दिले जाते. संध्याकाळी ६ नंतर शेंगदाणा पेंड दिली जाते. याशिवाय मधल्या वेळात कडबा दिला जातो. बैल एकावेळी ५० ते ६० लिटर पाणी पितात. त्यांना व्यायाम करवला जातो. दररोज त्यांची वैद्यकीय तपासमी केली जाते.