आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ तासांच्या शाळेसंदर्भात योग्य नियोजन हवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणासंबंधीच्या महाराष्ट्राच्या अहवालात विद्यार्थ्यांना आठ तासांची शाळा बंधनकारक असावी, असे नमूद करण्यात आले आहे. सध्या राज्यात सर्वत्र शाळा सहा तासांच्या आहेत. त्यात दोन तासांची भर पडणार असेल तर हरकत नाही, पण त्या वाढीव दोन तासांचे काळजीपूर्वक आणि काटेकोर नियोजन केले जावे, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

काही तज्ज्ञांनी मात्र हा निर्णय म्हणजे ‘हे स्वप्नरंजन’ आहे, असे म्हणत या प्रस्तावाला विराेध केला अाहे. आठ तासांच्या शाळेची शिफारस आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये सहा तास प्रत्यक्ष शिकवण्याचे, तर वाढीव उर्वरित दोन तास अन्य उपक्रमांना दिले जावेत, असेही अहवालात नमूद केले आहे. यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञांनी अनुकूल आणि प्रतिकूल अशी दोन्ही मते मांडली आहेत.
दरम्यान, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणासंदर्भातील हरकती व सूचना schoolennep@gmail.com या ई-मेल आयडीवर इंग्रजी किंवा मराठी भाषेत पाठवता येतील. हा संपूर्ण अहवाल www.education.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

चर्चेमागे राजकारणच
पहिलीपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आठ तासांची शाळा असावी, या शिफारशीवरून सध्या जी चर्चा सुरू आहे, ती काही मंडळी हेतुपुरस्सर राजकारणासाठी घडवून आणत आहेत. पण शिक्षण क्षेत्रात असे राजकारण आणू नये, असे मला वाटते. धोरणाचा हा मसुदा प्रस्तावित आहे, त्यावर विचारमंथन व्हावे. आरोप-प्रत्यारोप नसावेत. हा प्रस्ताव आहे, निर्णय नाही, याचे भान ठेवावे. सर्व संबंधितांशी साधकबाधक चर्चेनंतरच निर्णय घेतला जाईल.
विनाेद तावडे, शिक्षणमंत्री

कायदा काय सांगतो
आठवीपर्यंतच्या शाळेत किती काम करावे याचे बंधन शिक्षकांवर असते; पण विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या वेळेची कोणतीही मर्यादा नाही. साधारणपणे सहा तास विद्यार्थी सलग शिकू शकतात, असे शिक्षण हक्क कायद्यात म्हटले आहे.
काय म्हणतात शिक्षणतज्ज्ञ
डॉ. राम ताकवले : विद्यार्थ्यांच्या विकासासाठी हे धोरण उपयुक्त ठरू शकते; परंतु विद्यार्थ्यांचा फक्त बौद्धिक विकास करायचा की मानसिक, शारीरिक, भावनिक विकास, तांत्रिक कौशल्येही विकसित करायची याचा सुस्पष्ट विचार करायला हवा.

अ. ल. देशमुख : आठ तासांपर्यंत विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता असते, हे सिद्ध झाले आहे. शाळांमधले शिक्षणाचे तासही अर्धा तास वा ३५ मिनिटांचेच असतात. शाळा आठ तासांची केल्यास प्रत्येक विषयासाठी ४५ मिनिटे मिळू शकतील आणि शिक्षणाला न्याय मिळेल.
मीना चंदावरकर : आठ तासांची शाळा हे स्वप्नरंजन वाटते. राज्यातल्या बहुसंख्य शाळा आता दुबार भरतात. आठ तासांची शाळा केली तर दुबार शाळा बंद कराव्या लागतील आणि निम्मी मुले शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे.