आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. दाभोलकरांचा स्मृतीदिन: 2 वर्षांनंतरही तपास जैसे थे, आज राज्यभर कार्यक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन वर्षांनंतरही अद्याप दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध लावण्यात सरकार आणि पोलिस यंत्रणेला यश आलेले नाही. त्याचप्रमाणे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबतही तीच स्थिती आहे. त्यामुळे या सर्वांवर भाष्य करण्यासाठी अंनिसच्या वतीने एका रिंगण नाट्याच्या माध्यमातून सरकारचा निषेध करण्यात येत आहे.


डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा असा आदेश मुंबई हायकोर्टाने 9 मे 2014 रोजी दिला होता. त्यानंतर सीबीआयने तपासाला सुरुवात केली. मोटारसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी दाभोलकर यांची ओंकारेश्वर पुलावर गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याचदिवशी या प्रकरणाचा तपास पुण्याच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तब्बल 22 हून अधिक पथकांची स्थापना करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी रात्रंदिवस एक करूनही त्यांना यश आले नाही. अखेर मे 2014 मध्ये हा तपास पुणे पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग झाला होता. तेव्हापासून सीबीआय या प्रकरणाचा तपास करीत आहे.

प्लँचेट करणा-यांवरही कारवाई नाही...
दाभोलकरांसारख्या विवेकवादी कार्यकर्त्याच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेट करण्याचा प्रतापही पोलिस यंत्रणेने केल्याचे मधल्या काळात उघड झाले होते. त्यानंतर यावर सगळीकडून मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उडाली. त्यानंतर सरकारने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही या प्रकरणातील दोषी अधिका-यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.


रेखाचित्रे जारी पण फायदा नाही...
सीबीआयने या प्रकरणाच्या तपासाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सुमारे वर्षभरानंतर म्हणजे मे 2015 मध्ये संशयितांची रेखाचित्रे नव्याने सादर केली. सीबीआयने प्रत्यक्ष साक्षीदारांच्या सांगण्यावरून संशयित मारेक-यांची रेखाचित्रे तयार केली असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांच्या मदतीने लवकरात लवकर तपास लागण्याचा विश्वासही सीबीआयने व्यक्त केला होता. मात्र तोही फोल ठरला. दाभोलकरांच्या मारेक-यांची माहिती देणाऱ्यास राज्य सरकार व पुणे पोलिसांनी 11 लाखांचे बक्षीसही जाहीर केलेले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, कॉम्रेड पानसरेंचे मारेकरीही सहा महिन्यांपासून मोकाट...