आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक प्रचारातील भाषेने ढवळले ‘सांस्कृतिक पुणे’, पवारांचा संयम सुटला, राज झाले गंभीर; (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे  - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चुरस शिगेला पोहोचल्याने निवडणूक प्रचारातल्या भाषेने सांस्कृतिक राजधानी पुणे ढवळून निघाली. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या वक्तव्याचीही पातळी घसरली. उद्धव ठाकरे, अजित पवारांच्या विनोद बुद्धीला चांगली दाद मिळाल्याचे पाहण्यास मिळाले. ‘ठाकरी’ शैलीत विरोधकांवर तुटून न पडता गंभीरपणे शहर विकासाचे ‘प्रेझेंटेशन’ देणारे दुर्मिळ राज ठाकरेही श्रोत्यांनी ऐकून घेतले.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यासह केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू, मनोहर पर्रीकर, प्रकाश जावडेकर, राज्यातले मंत्री गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, विजय शिवतारे तसेच माजी मंत्री नारायण राणे, अजित पवार, हर्षवर्धन पाटील आदींनी पुण्यातल्या सभा गाजवल्या. सर्वांच्या टीकेचे प्रमुख लक्ष्य हाेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप.
  गंमत म्हणजे स्थानिक निवडणूक असूनही पुण्याच्या प्रचारात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही उल्लेख झाला. आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात असलेल्या औंध, हिंजवडी, बाणेर, बालेवाडी या भागातल्या भाजपच्या सभेत ट्रम्प यांचे नाव निघाले. अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या ‘आयटी प्रोफेशनल्स’ना वर्क व्हिसा मिळवून देण्यासाठी आमचे सरकार ट्रम्प यांच्याकडे शिफारस करेल, असा शब्द मतदारांना देण्यात अाला.  संभाजी बागेतील राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडून टाकण्यात आल्याचा मुद्दा सर्वच पक्षांनी प्रचारापासून कटाक्षाने बाजूला ठेवला, हे विशेष. राज ठाकरे यांनी नक्कल, टीका, विनोद, इशारे वगैरे टाळून नगर नियोजनाबद्दल त्यांनी केलेले प्रेझेंटेशन पुणेकरांनी शांतपणे ऐकून घेतले. 
 
पवारांचा असभ्यपणा  
पिंपरीच्या प्रचार सभेत शरद पवारांनी ‘आंधळ्याचा हात'  ही अश्लील म्हण वापरली. फडणवीस यांचे नाव न घेता त्यांना नशिबाने पद मिळाले आहे, असे सांगून पवारांनी या म्हणीचा अर्धा भाग सांगितला. त्यानंतर ‘जास्त मी काही सांगत नाही,’ असे म्हणून ते थांबले. पवारांनी महिलांसमोर केलेल्या या वक्तव्याबद्दल आश्चर्य व्यक्त हाेत आहे. ‘सगळं आपणंच केलं म्हणण्याची सवय असलेल्या मुख्यमंत्र्यांना अनाथ आश्रमात पाठवू नये,’ अशी टिप्पणीही पवारांनी दुसऱ्या सभेत केली.  
 
थोडी टीका, थोडी गंमत  
- उद्धव फक्त टीका करतात. त्यांची औकात आम्हाला माहिती आहे. आज एकमेकांवर बोलतात. उद्या एकत्र येतात. सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत.’  -नारायण राणे.  
 
- भाजप फक्त गाजरे दाखवत आहे. त्यांनी इतकी गाजरं दाखवली की, लोकं गाजराचा हलवा खाण्याचं विसरून गेले. आता कुणाच्या घरी जेवायला गेलं की, जेवायला काय तर म्हणे ‘गाजर का हलवा’ एवढा त्या गाजराचा बट्ट्याबोळ भाजप-शिवसेनेने केला.’- अजित पवार  
 
-सत्तेत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीला मुस्लिमांची आठवण होत नाही. सत्तेत असून त्यांनी हज हाऊस केले नाही. पाण्याबाबतचे अजित पवारांचे विधान तर सर्वांना माहीत आहे. भाजपला गरज पडेल तेव्हा पाठिंबा देण्याची भाषा बोलणाऱ्या शरद पवारांना निवडणुकीतच धर्मनिरपेक्षता कशी आठवली.’ -असदुद्दीन ओवेसी  
 
-‘सामना’ बंद ठेवण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. मग ही आणीबाणी नाही का? इंदिरा गांधींवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला आधी बूच लावा.’   -उद्धव ठाकरे.  
बातम्या आणखी आहेत...