आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रीकरणामुळे भडकल्या आशाताई, माध्‍यमांच्‍या बहिष्‍कारानंतर मागितली माफी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठगायिका आशा भोसले यांचा संताप सहन करण्याची पाळी संमेलनाच्या आयोजक रसिकांवर आली. निमित्त होते रविवारी संध्याकाळी आयोजित 'आशा भोसले संगीत रजनी'चे.
"मागे उभा मंगेशु, पुढे उभा मंगेशु,' या गाण्याने आशाताईंनी कार्यक्रम सुरू केला. त्यानंतर पाच- सहा गीते सादर केली. याच दरम्यान, कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि मोबाइलच्या माध्यमातून चित्रीकरण होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याक्षणी आशाताईंनी गाणे थांबवले आणि चित्रीकरण बंद झाल्याशिवाय गाणार नसल्याचे सांगितले. यामुळे रंगलेल्या कार्यक्रमात एकदम सन्नाटा पसरला. आशाताईंनी अचानक घेतलेल्या या पवित्र्यामुळे आयोजक भांबावून गेले.

आयोजकांना फैलावर घेत झालेले चित्रीकरण परत करण्याचीही मागणी आशाताईंनी केली. त्यांची समजूत काढण्यासाठी आयोजक धडपडत होते. पण काही ऐकता ताईंनी मंच सोडला. स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील त्यांची समजूत काढण्यासाठी गेले. परंतु भडकलेल्या ताईंनी त्यांनाही दाद दिली नाही. त्यामुळे सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांनी तरुण गायक ऋषीकेश रानडे यांच्याकडून गाणी गाऊन घेतली. काही मिनिटांनी आशाताई पुन्हा रंगमंचावर आल्या, त्याही साडी बदलून. त्यामुळे 'विश्रांती' घेण्यासाठी तर त्या भडकल्या नाही ना, अशी चर्चा होती. आशाताई म्हणाल्या, "तशी मी फार गोड बाई आहे. पण कधीतरी राग येतोच ना. पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका.' नंतर श्रीधर फडके यांच्या 'सांज ये गोकुळी,' या गीताने पुन्हा त्यांनी मैफल सुरू केली. आणि श्रोत्यांच्या प्रतिसादात ताईंनी मैफल जिंकली.
माध्यमांचा बहिष्कार, आशाताईंकडून माफी
भडकलेल्या आशाताईंनी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे कॅमेरेही हटविण्याची मागणी केली. त्यामुळे पत्रकार कॅमेरामन भडकले. 'हा सार्वजनिक कार्यक्रम आहे की खासगी मैफल?' असा प्रश्न विचारून माध्यमांनीच मग या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आयोजकांची पुन्हा भंबेरी उडाली. स्वत: स्वागताध्यक्ष पाटील नंतर आशाताईंनीही माध्यम प्रतिनिधींची माफी मागितली.