आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांनी नोंदणीशुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांचे निकाल बोर्डाकडे राखीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - विद्यार्थ्याला बोर्डाच्या परीक्षेला बसवताना, त्याचे नोंदणीशुल्क शाळांना राज्य बोर्डाकडे जमा करावे लागते. मात्र राज्यातील शेकडो शाळांनी हे नोंदणीशुल्कच न भरल्याने राज्य बोर्डाने अशा विद्यार्थ्यांचे निकाल अडवून ठेवण्याचे धोरण अवलंबिले अाहे. विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र समोर आले आहे. पुण्यासह सोलापूर व अहमदनगर विभागीय मंडळातील सुमारे साडेतीनशे शाळांचे निकाल राखून ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नुकसान होऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दहावी आणि बारावी दोन्ही इयत्तांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांची पुरवणी वा फेरपरीक्षा जुलै २०१६ मध्ये राज्य बोर्डाकडून घेण्यात आली. या परीक्षेचा निकालही ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात आला. मात्र या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळवण्यासाठी निकालाच्या ज्या अधिकृत प्रती अनिवार्य आहेत, तो निकाल अडवून ठेवण्याचे धोरण बोर्डाने स्वीकारले आहे. शाळांनी प्रत्येक विद्यार्थ्यामागे बोर्डाला नोंदणीशुल्क देणे तसेच शिक्षण संक्रमण या मासिकाची वर्गणी भरणे अपेक्षित आहे. ती शाळांनी न भरल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आल्याचे समोर आले.
अद्याप तक्रार नाही
ज्या शाळांनी नोंदणीशुल्क व वर्गणी शुल्क भरलेले नाही, त्या शाळांच्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत. त्यापैकी काही शाळांनी आता पैसे भरून निकाल नेण्यास सुरवात केली आहे. अद्याप कोणाचीही याबाबत तक्रार आलेली नाही.

पुष्पलता पवा, सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
बातम्या आणखी आहेत...