आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वबळाची भाषा नाही पण सन्मान तर हवाच, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शिवसेनेबरोबर युतीची चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत. आमची भाषा स्वबळाची नाही. आम्हाला युती हवी आहे; मात्र आमचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, अशी सावध भूमिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी घेतली.

सन्मान राखायचा म्हणजे काय, या प्रश्नावर दानवे म्हणाले, ‘जागावाटपासंबंधी शिवसेनेचा प्रस्ताव त्यांनी आम्हाला द्यावा. आमचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारावा. दोन्हीवर चर्चा होऊन दोघांच्या हिताचा निर्णय एकमताने घेतला जाऊ शकतो.’

पुण्यातील निवडणूक पक्ष कार्यालयाचे उद््घाटन दानवे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले तसेच आमदार व इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. भाजपने युती तोडून दाखवावी, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले आहे. यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र शिवसेनेसोबतच्या युतीबद्दलची स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. याबद्दल विचारणा करता, शिवसेना आणि आमच्या भाषेत पहिल्यापासूनच फरक आहे, अशी टिप्पणी दानवे यांनी केली.

दानवे यांनी सांगितले, की मुख्यमंत्री आणि मी राज्याच्या सर्व भागात विभागीय पातळीवर बैठका घेत आहोत. राज्यातला क्रमांक एकचा पक्ष होण्याचा आमचा प्रयत्न असेल. असे करताना मित्रपक्षांशी युती करण्याचा निर्णय जिल्हावार स्थानिक नेतृत्वाने प्रदेश शाखेशी बोलून करावा.
युती होत असेल तिथे ती करावी अन्यथा स्वबळावर लढावे, असे दानवे त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...