आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यिकांनी आमचा कित्ता गिरवू नये, शरद पवार- मुख्यमंत्र्यांचा साहित्यिकांना टाेला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्यानबा-तुकाराम नगरी - भरगच्च कार्यक्रम, विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांची मांदियाळी, साहित्याचा उत्सव साजरा करत असताना दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्यांप्रति दाखवलेली संवेदना, ज्येष्ठ हिंदी कवी गुलजार यांच्या शब्दांनी लावलेले "चार चाँद' आणि सरतेशेवटी ज्येष्ठ नेेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्यिकांची घेतलेली फिरकी अशा बहुढंगी घटनांनी शनिवारी पिंपरीत ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद‌््घाटन सोहळा रंगला.

शरद पवार यांनी चिपळूण, सासवड, घुमानपाठोपाठ पिंपरीतल्या सलग चौथ्या संमेलनास उद‌््घाटक म्हणून उपस्थिती लावली. स्वतः पवार यांनाही या उपस्थितीचा विशेष उल्लेख करण्याचा मोह आवरला नाही. श्रीपाल सबनीस यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार की नाही, याबद्दल साशंकता होती. मात्र फडणवीस केवळ उपस्थितच राहिले नाहीत तर सबनीसांना त्यांनी मार्गदर्शन करण्याचीही विनंती केली.

या वेळी शरद पवार म्हणाले, "संमेलनाध्यक्षाच्या निवड प्रक्रियेबाबत कुठेतरी विचार व्हावा. हे कुठे तरी थांबवा. मते मिळवणे हा आम्हा लोकांचा अधिकार आहे. साहित्यिकांनी आमचा कित्ता गिरवू नये. (जोरदार हशा) त्यापेक्षा पाच माजी संमेलनाध्यक्षांची समिती नेमून त्यांना नव्या अध्यक्षाची निवड करायला सांगा. अनेक चांगले साहित्यिक निवडणूक नको म्हणून बाजूला राहतात. त्यामुळे याचा विचार व्हावा.’ संमेलनाध्यक्षांच्या वादात आम्हालाही ओढण्याचा प्रयत्न होतो, असे सांगून पवार म्हणाले, "दूरचित्रवाणीवरचे तथाकथित विचारवंत या निवडणुकीत पवारांचा हात असल्याचे सांगतात. महाराष्ट्रातल्या कोणत्याही घटनेस शरद पवार जबाबदार असल्याचा समज आधीच दृढमूल झाला आहे. कोयनेला भूकंप झाला तरी त्यामागेही माझाच हात असल्याचे सांगितले जाते. (हशा) परंतु सबनीस संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर त्यांची आणि माझी पहिली भेट झाली हे मी तथाकथित विचारवंतांना सांगू इच्छितो.’ (हशा)

नेमके काय बोलावे या संदर्भात गोंधळ असल्याचे सुरुवातीलाच मुख्यमंत्री म्हणाले. ‘उद््घाटनाला जाणार का, असा प्रश्न मला काल विचारण्यात आला. मी हाे म्हटल्यावर जोरात होऊन जाऊ द्या, असा सल्ला मला देण्यात आला. त्यावर मी संमेलनाला चाललोय की टी-ट्वेंटी खेळायला हेच मला समजेना. (हशा). संमेलनाचे एक पावित्र्य आहे. हे दिशादर्शन करणारे व्यासपीठ आहे. वादविवाद होत असतात. मात्र इतर वादांपेक्षा साहित्यिक वादांकरिता संमेलन प्रसिद्ध व्हावे,’ असा चिमटा त्यांनी काढला. संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक नको, या पवारांच्या सूचनेला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिला.

मान्यवरांची मांदियाळी
९७ वर्षीय संस्कृत लेखक सत्यव्रत शास्त्री, काश्मिरी लेखक रेहमान राही, डॉ. सीताकांत महापात्रा व डॉ. प्रतिभा राय हे चार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रथमच संमेलनास उपस्थित हाेते. या शिवाय, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, संदीप वासलेकर, बिहारचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, डॉ. शां. बं. मुजुमदार, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, अजित पवार, रामदास आठवले, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे आदींचीही उपस्थिती हाेती.

बदनाम हुए तो...
संत तुकोबांच्या 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,' या वचनाचा विसर पडल्याने सततचा दुष्काळ, नापिकी आणि शेतकरी अात्महत्यांचे सत्र सुरु झाले. मंगेश पाडगावकरांचे ‘शतदा प्रेम करावे,' हे शेतकऱ्यालाही वाटले पाहिजे. त्यासाठी समाजातली नकारात्मकता कमी झाली पाहिजे. प्रसिद्धीचा सोपा उपाय म्हणून अलिकडे नकारात्मकता वाढीस लागली आहे. माध्यमेसुद्धा नकारात्मक झाली आहेत.'बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ,' अशी भूमिका घेतली जाते. सकारात्मकतेचा प्रसार करणारे, उर्जादायी साहित्य लोकांपुढे यावे, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

पुढील स्लाइडवर वाचा, काय म्हणाले गुलजार...