आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक गुणवत्तेच्या अभ्यासासाठी शिक्षक निघाले फॉरेनला, स्वखर्चाने जाणार विदेशात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शैक्षणिक गुणवत्तेच्या जागतिक क्रमवारीत युरोपीय देश आणि अमेरिकेला मागे टाकून पुढे गेलेल्या आशियाई देशांना भेटी देऊन तेथील शैक्षणिक गुणवत्तेचा ‘अभ्यास’ करण्यासाठी राज्यातील शिक्षक उत्सुक आहेत. अशा उत्सुक शिक्षकांची पहिली बॅच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सिंगापूरला भेट देणार असल्याचे वृत्त आहे. शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

शैक्षणिक गुणवत्तेची चर्चा सध्या जोरात आहे. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक गुणवत्तेच्या जागतिक क्रमवारीत ‘प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट’ (पिसा) या अहवालानुसार आशिया खंडातील सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग हे देश सर्वात पुढे असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे राज्यातील ‘गुरुजीं’नी गुणवत्तावाढीच्या पाहणीसाठी थेट फॉरेनला जाण्याचा बेत आखला आहे. पिसाच्या अहवालाचा उल्लेख राज्याच्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’च्या शासन निर्णयातही करण्यात आला आहे. जागतिक पातळीवरील युरोपीय देश, अमेरिका यांनाही मागे टाकून गुणवत्तेच्या जोरावर पहिले चार क्रमांक पटकावणाऱ्या या देशांमधील शिक्षण पद्धती नेमकी कशी आहे, विद्यार्थ्यांना ते कसे शिकवतात, कोणत्या पद्धती, साधनांचा वापर करतात,
आपण कुठे कमी पडतो... अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यास शिक्षक उत्सुक आहेत.
१८६ शिक्षक इच्छुक, ४० जणांची पहिली बॅच
शिक्षण विभागानेच शिक्षकांना या देशांत जाऊन अभ्यास करून येण्यासाठी प्रवृत्त केले आहे. परंतु हा अभ्यास दौरा प्रत्येक शिक्षकाने स्वखर्चानेच करायचा आहे, हेही स्पष्ट केले आहे. शिक्षकांनी जाण्याची परवानगी देणे, एवढीच शिक्षण विभागाची भूमिका आहे. कुणालाही कुठलीही आर्थिक मदत दिली जाणार नाही. वरील चारपैकी कोणत्याही देशांत शिक्षक जाऊ शकतात. या उपक्रमांतर्गत राज्यातून सुमारे एक हजार शिक्षक सहभागी होतील, असा अंदाज नंदकुमार यांनी व्यक्त केला. सध्या विभागाकडे १८६ शिक्षकांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी ४० जणांची पहिली बॅच नोव्हेंबर महिन्यात सिंगापूरला जाणार आहे, असेही ते म्हणाले.
शिक्षक स्वखर्चाने जाणार
आशिया खंडातील चार देश कोणत्या निकषांमुळे जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी आहेत याचा अभ्यास करणे हा दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. शिक्षक स्वखर्चाने जाणार आहेत. आम्ही फक्त त्या-त्या देशांतील शिक्षण यंत्रणेशी संपर्क साधून आपल्या शिक्षकांना तेथील योग्य त्या व्यक्ती, यंत्रणा यांच्याशी संपर्क व्हावा यासाठी प्रयत्नशील आहोत. बाकी सर्व गोष्टी शिक्षक सांभाळणार आहेत. - नंदकुमार, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग
बातम्या आणखी आहेत...