पुणे - पिंपरी- चिंचवडच्या चिखली परिसरातील माेरे वस्तीत राहत असलेल्या उच्चशिक्षित जाेडप्याने घरात गळफास घेऊन अात्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस अाली. या जाेडप्याने काेणत्या कारणास्तव अात्महत्या केली याचा अद्याप खुलासा झालेला नसल्याचे निगडी पाेलिसांनी स्पष्ट केले अाहे. अनिकेत विलास ढमाले (वय-२५) व अश्विनी अनिकेत ढमाले (२२) असे अात्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव अाहे.
अनिकेत मेकॅनिकल इंजिनिअर तर अश्विनी फॅशन डिझायनर म्हणून काम करत हाेती. एक जानेवारी २०१६ अनिकेत व अश्विनी यांचे लग्न झाले हाेते. सध्या ते दाेघे माेरेवस्तीमधील सुदर्शननगर येथे अनिकेतचे अाई-वडील व भाऊ यांच्यासाेबत राहत हाेते.
रविवारी संध्याकाळी अनिकेत याच्या घरातील सर्वजण लग्न समारंभाच्या निमित्ताने बाहेर गेले हाेेते. ही संधी साधून अनिकेत व अश्विनी यांनी घरात गळफास घेऊन अात्महत्या केली.
अनिकेतचा भाऊ घरी परतल्यानंतर, सदर प्रकार उघडकीस अाला. घराच्या हाॅलमध्ये पंख्याला अनिकेतचा मृतदेह तर बेडरूममध्ये अश्विनीचा मृतदेह पाेलिसांना मिळून अाला. निगडी पाेलिस याप्रकरणी पुढील तपास करीत अाहे.