पुणे- ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला तर तुम्ही संघटनेबरोबर राहणार की नाही,’ या एकमेव प्रश्नाच्या उत्तरावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांच्यातील भविष्यातील संबंध अवलंबून असणार आहेत. खोतांसंदर्भातला निर्णय घेण्यासाठी संघटनेने नेमलेल्या समितीसमोर शुक्रवारी खोत पुण्यात उपस्थित झाले. समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ते दशरथ सावंत, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे, सतीश काकडे, रविकांत तुपकर यांच्यासमवेत खोत यांची दोन तासांहून अधिक वेळ चर्चा झाली. खोत यांनी एकदा शेट्टींशी चर्चा करावी, असे चर्चेअंती समितीतर्फे सुचवण्यात आले.
भाजप सरकारसोबत राहणे किंवा न राहण्याचा संघटनेचा निर्णय स्वीकारणार का, या प्रश्नावर खोत म्हणाले, ‘शेट्टींनी या संदर्भातला निर्णय आधी जाहीर केल्याशिवाय मी काही बोलणे उचित होणार नाही. माझ्याबद्दलचा निर्णय त्यांनी लवकर घ्यावा. या वादावर मी यापुढे भाष्य करणार नाही. त्यांचा निर्णय आल्यानंतर मी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन माझा निर्णय घेईन. चेंडू त्यांच्या कोर्टात आहे. निर्णय नेतृत्वाने करावा.’
दरम्यान, दुपारी अडीचनंतर सुरू झालेल्या या बैठकीपूर्वी खोत यांनी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. शेट्टी-खोत यांनी जुळवून घ्यावे, खोतांना चौकशीसाठी बोलावून शेट्टींनी त्यांचा अपमान केला, अशी परस्परविरोधी मते यात व्यक्त करण्यात आली. मात्र, खोत जो काही निर्णय घेतील त्याबरोबर आम्ही सर्व राहू, अशी ग्वाहीही कार्यकर्त्यांनी या वेळी दिली. त्यानंतर खोत म्हणाले, ‘ऑगस्टमध्ये मी राज्यभर दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून नंतर निर्णय घेईन.’
स्वाभिमानीला रामराम
‘आजपासून ‘स्वाभिमानी’ला राम राम. यापुढे कोणतीही समिती मला बोलावू शकणार नाही. मी फक्त शेतकऱ्यांपुढे जाणार. झेंडा आपला, दांडा आपला आणि दोरीही आपली. पुढील निवडणुकीला आणखी अडीच वर्षांचा कालावधी आहे. तोवर कार्यकर्त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संपर्क साधावा,’ अशी अाक्रमक भूमिका खाेत यांनी घेतली.
माझ्यावर अाराेप करणाऱ्यांना माफी
केवळ चळवळीमुळे मी मंत्री झालो. नेतृत्वाने मला काम करण्याची संधी दिली. मात्र, काहींनी अपमानास्पद शब्द वापरले, आरोप केले. त्यांना मी माफ करतो. यापुढे वादात न पडता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना भिडणार आहे. माझ्या भवितव्याची काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी सत्ता राबवणे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे,’ असे खोत यांनी स्पष्ट केले.
शेट्टींशी बाेलण्याची माझी कधीही तयारी
चाैकशी समितीसमाेर हजेरी लावल्यानंतर पत्रकार परिषदेत खोत म्हणाले, ‘संघटनेतील अंतर्गत वादावर खेळीमेळीत चर्चा झाली. समिती त्यांचा अहवाल नेतृत्वासमोर (शेट्टी) ठेवेल. परत एकदा नेतृत्वाबरोबर चर्चा करण्याबद्दल माझ्याकडे विचारणा करण्यात आली. त्याला मी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नेतृत्वाला माझ्याशी बोलायचे असेल तर माझी तयारी आहे.’
उतावीळपणा नाहीच : दशरथ सावंत, अध्यक्ष, चौकशी समिती
‘आमची भूमिका पूर्वग्रहदूषित नाही. संघटना उभारण्यासाठी वर्षे जातात. मोडायला वेळ लागत नाही. शेतकरी प्रश्नांवरचे आंदोलन निर्णायक टप्प्यावर असताना उतावीळपणा करणार नाही. खोत यांनी दिलेल्या लेखी उत्तरांमधले तथ्य तपासून पाहू. काही उत्तरांच्या खरेपणाबद्दल चौकशी करावी लागेल. तीन-चार दिवसांत आम्ही अहवाल देऊ.’
खाेतांनी चाैकशी समितीसमाेर शेट्टींना उद्देशूनच केले प्रतिप्रश्न
प्रश्न : ‘शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजपला सत्तेवर आणण्याची चूक झाली म्हणून मी आत्मक्लेश यात्रा काढण्याची राजू शेट्टींची भूमिका केवळ आत्मप्रौढीसाठी नौटंकी होती का?
खोत : भाजपने फसवणूक केली असे जर आपल्याला वाटते तर कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपला पाठिंबा का दिला आणि त्या बदल्यात सभापतिपद का मिळवले, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समजून येत नाही. शेट्टींची आत्मक्लेश यात्रा ही बदललेल्या राजकीय भूमिकेची निदर्शक आहे. नेतृत्वाच्या या निर्णयावर टिप्पणी करणे मला योग्य वाटत नाही. भाजप सरकारला सत्तेवर आणून चूक केली असे शेट्टींना वाटते तर त्यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांना पाठिंबा का दिला?
प्रश्न : संघटनेशी सल्लामसलत न करता शेतकरी संप मोडण्याचा अापण प्रयत्न केला, आंदोलनावर टीका केलीत?
खोत : कृषिमंत्री म्हणून शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मला पाठवले. संपकरी शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्याच्या बैठकीचे निमंत्रण मी प्रा. जालिंदर पाटील यांच्याकडून शेट्टी यांना दिले होते. मात्र, ते आंदोलन पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचे आहे, या ठिकाणी आपण जाणे योग्य नाही, असे शेट्टींचे मत असल्याचा उलटपक्षी निरोप मला प्रा. पाटील यांनी दिला. मी आंदोलनाच्या विरोधात कुठलीही भूमिका घेतली नाही. उलट आंदोलन हिंसक होऊ नये, पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीहल्ला होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून प्रयत्न केले.
प्रश्न : महिला आघाडी प्रदेशाध्यक्षांना फोन करून जातीयवादी वक्तव्य केले?
खोत : त्यांना मी स्वतःहून फोन केलेला नाही. त्यांच्या फोन कॉल्सच्या नोंदी तपासाव्यात. त्यात माझा नंबर असेल तर मी आरोप मान्य करतो.
प्रश्न : शेतकरी आत्महत्या करत असताना मंत्री-आमदारांचे पगार वाढवले. याला तुम्ही विरोध केला का?
खोत : तशी सूचना संघटनेकडून आली असती तर मी निश्चित विरोध केला असता. आमदारांच्या वेतनवाढीआधी केंद्रानेही खासदारांची वेतनवाढ केली. त्या वेळी शेट्टींनी त्यांचे वाढवलेले वेतन सरकारकडे जमा केले का?
प्रश्न : काँग्रेसच्या घराणेशाहीवर संघटना टीका करत असताना आपल्या मुलाला निवडणुकीचे तिकिट देण्यात घाई केलीत
खोत : पक्षाने जि.प. निवडणुकीत प्रकाश परीट, उल्हास पाटील, प्रा. जालिंदर पाटील यांच्या पत्नीला तिकीट दिले. कोल्हापूर जि.प. अध्यक्षपदाला पक्षाने जो पाठिंबा दिला तोही घराणेशाही राजकारणाचाच भाग होता. माझ्या मुलाला तिकीट देण्याचा निर्णय शेट्टी यांच्याशी चर्चा करून झाला होता.
प्रश्न : शेतकरी चळवळीतला नेता म्हणून आपल्याला आपल्या कृत्यांचा पश्चात्ताप होतो का? होत असल्यास त्याचे पापक्षालन करावे वाटते का?
खोत : मला अजूनही माझ्या कृत्याबाबत आत्मक्लेश झालेला नाही. सरकारला मी शेतकऱ्यांच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या दिवशी माझ्या हातून हे काम होणार नाही त्या दिवशी आपल्याला कल्पना देऊन मी निश्चितपणे आत्मक्लेशाचा मार्ग पत्करेन.