आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive : ‘एनसीडीईएक्स’वर मराठी पोल्ट्री उद्योजकाकडून शंभर टन मका खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शेतकरी उत्पादक कंपनीने वायदे बाजारात सहभागी होऊन त्यांचा माल पोल्ट्री उत्पादकाने वायदे बाजारातूनच खरेदी करण्याचा पहिलाच व्यवहार नॅशनल कमॉडिटी अँड डेरिव्हेटिव्हज एक्स्चेंजवर (एनसीडीईएक्स) महाराष्ट्रात झाला आहे. अलिबाग (जि. रायगड) येथील ३४ वर्षांच्या तरुण पोल्ट्री उद्योजकाने एनसीडीईएक्सच्या जळगावातील गोदामातून शंभर टन मक्याची पहिली खरेदी केली.   
 
‘एनसीडीएक्स’च्या माध्यमातून २००४ मध्ये देशात सुरू झालेल्या वायदेबाजारावर दलाल, व्यापाऱ्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्याला मनाजोगती किंमत न मिळणे आणि अंतिम ग्राहकाला किफायती दरात शेतमाल न मिळण्याची पारंपरिक प्रथा एनसीडीईएक्सवरही सुरू आहे. अलीकडच्या दीड वर्षात राज्यात स्थापन होऊ लागलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या (फार्मर प्रोड्युसर कंपनी) एनसीडीईएक्सच्या कामकाजात थेट सहभागी होऊ लागल्याने मात्र हे चित्र अाता बदलू लागले अाहे.    
 
अलिबाग येथील कुणाल पाथरे यांचा पोल्ट्री उद्योग आहे. या उद्योगातील कोंबडी खाद्यामध्ये मक्याचा वाटा सुमारे ७०  टक्के असतो. वार्षिक ७३ कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या पाथरे यांना दरमहा १५०० टन मक्याची गरज असते. बी.कॉम. पर्यंत शिकलेल्या पाथरे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, ‘गेल्या दोन वर्षांपासून मी एनसीडीईएक्समध्ये हेजिंग करून मक्याची खरेदी-विक्री करत होतो. यात फायदा मिळवण्याचा माझा प्रयत्न असायचा. अमेरिकेत सिबॅटला जुनी पार्श्वभूमी आहे. आपल्याकडे हे सगळे अजून खूप नवीन आणि अपरिपक्व स्तरावर आहे. आधीच्या काही सौद्यात मला फायदा झाला. तोटाही झाला. अातापर्यंत मक्याच्या डिलिव्हरीसाठी मला बिहार, तेलंगणामधली गोदामे मिळायची. या वेळी एनसीडीईएक्सचे जळगावचे गोदाम मिळाले. त्यामुळे या वेळी वायदे बाजारात केवळ सौदेबाजी न करता मक्याची थेट डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला,’ असे पाथरे म्हणाले.  मार्च महिन्यात मक्याचा सौदा केला. २० मेपर्यंत त्याच्या डिलिव्हरीचा निर्णय घ्यायचा होता. मला १४२० रुपये प्रतिक्विंटल दराने मका मिळाला. वाहतूक खर्चासह ही किंमत साडेपंधराशे रुपयांवर जाईल. या व्यवहारात मला एकदम नफा मिळाला असे नाही. पण खात्रीने, हवा तेव्हा शेतमाल पोहोच झाला. दरातील चढ-उतारापासून वाचलो, असेही त्यांनी नमूद केले.    
 
पुण्यातील कंपनीही उतरली स्पर्धेत  : पुण्यातील महा फार्मर प्रोड्युसर कंपनी ‘एनसीडीईएक्स’च्या व्यवहारात उतरली आहे. या कंपनीने विविध शेतमाल उत्पादन करणाऱ्या दोनशे शेतकरी कंपन्या जोडून घेतल्या आहेत. ‘महा फार्मर’तर्फे एनसीडीईएक्सचे काम पाहणारे प्रशांत पवार यांनी सांगितले, ‘यंदा आम्ही ३३ हजार टन तूर शेतकऱ्यांकडून खरेदी केली. एनसीडीईएक्सवर ३० टन हळद आणि ४० टन मक्याची विक्री केली. हा आमचा पहिलाच प्रयोग होता. एनसीडीईएक्सवर सौदेबाजी करण्यासाठी तांत्रिक व आर्थिक कारणांमुळे थेट शेतकरी व्यक्तिगत स्तरावर जाऊ शकत नाही. ब्रोकरच्या माध्यमातून व्यवहार करावा लागतो. मात्र थोडे थांबण्याची तयारी असेल तर शेतमालाच्या किमतीची जोखीम कमी करणे एनसीडीईएक्सच्या माध्यमातून शक्य होते.’   
 
दलाल हटवण्यासाठी   
- ‘एनसीडीईएक्समध्ये आजही व्यापाऱ्यांचेच प्राबल्य आहे. ज्यांनी मका बघितला नसेल असे लोक येथे मक्याचे वायदे करतात. शेतकरी आणि अंतिम ग्राहक यांच्यातली दरी कमी करण्यासाठी एनसीडीईएक्स हा चांगला पर्याय आहे. पहिल्याच यशस्वी अनुभवानंतर पुढची मोठी खरेदी वायदे बाजारातून करू शकेन. साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मका महागतो. उपलब्धताही कमी असते. त्यामुळे त्या महिन्यातील खरेदीचे सौदे मी आताच वायदे बाजारात करणार आहे. अर्थात वायदे बाजार आपल्यासाठी नवीन असल्याने या आभासी बाजाराचे यशस्वी मॉडेल बनण्यास वेळ लागू शकतो.’   
-कुणाल पाथरे, पोल्ट्री उद्योजक, अलिबाग   
 
संधी आणि जोखीम   
- ‘वायदे बाजार म्हणजे भविष्यातल्या मालाचा सौदा. पेरणीआधीच मालाची किंमत निश्चित करण्याची सोय येथे आहे. उदाहरणार्थ येत्या नोव्हेंबरमधील सोयाबीनचा वायदे बाजारातील दर २८७१ रुपये प्रतिक्विंटल आहे. ऑक्टोबरमधला सोयाबीनचा वायदा २८५४ रुपये प्रतिक्विंटल आहे. जागतिक मंदीमुळे सोयाबीनचे दर घसरले आहेत. त्यामुळे या दराने विक्री करण्याचा सल्ला मी देणार नाही. भविष्यात सोयाबीनच्या किमती वाढू शकतात. पण वायदे बाजारातला सौदा केव्हाही मोडता येत असल्याने जोखीम राहत नाही. शेतकरी गटांना कंपनी रजिस्टर करून एनसीडीईएक्सचे सदस्य होता येते. प्रत्यक्ष व्यवहार करताना मात्र जोखीम लक्षात घ्यायला हवी; शेतमाल कधी व कसा विकावा हे ज्याला समजते तो वायदे बाजारातून अमर्यादित नफा मिळवताना दिसतो.’   
-दीपक चव्हाण, कमोडिटी मार्केट अभ्यासक   
 
शेतकरी गटांना प्रशिक्षण   
- ‘एनसीडीईएक्स ही शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी चांगली संधी आहे. कमीत कमी दहा टन शेतमाल वायदे बाजारात विक्रीला ठेवता येतो. बारदाना, वाहतूक, प्रत चाचणी या सगळ्यांचा विचार करून वायदे बाजारात किती दिवस शेतमाल ठेवायचा याचा विचार करावा लागतो. पुण्याच्या शेतकरी उत्पादक कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर ४० टन मका वायदे बाजारात उतरवला. मका, सोयाबीन, धने, एरंड, कापूस, हळद, गहू, सरकी आदी शेतमालाची विक्री महाराष्ट्रातील शेतकरी वायदे बाजारात करू शकतात. शेतकरी गटांना वायदे बाजाराचे प्रशिक्षण आम्ही देतो. अधिक माहितीसाठी somesh.vaidya@ncdex.com या पत्त्यावर ई-मेल पाठवावा.’   
-सोमेश वैद्य, वरिष्ठ अधिकारी, एनसीडीईएक्स   
 
असा चालताे ‘एनसीडीईएक्स’चा व्यवहार   
- एनसीडीईएक्स वायदे बाजारात दोघांकडून हेजिंग करतात. अपेक्षित फायदा गृहीत धरून विक्रेता व खरेदीदार मालाची किंमत निश्चित करतात. उदाहरणार्थ ऑगस्टमध्ये अठराशे रुपये प्रतिक्विंटलने २० टन मक्याची विक्री खरेदी आहे. हा सौदा मान्य असणारा विक्रेता त्यास होकार देतो.  
- दोघांच्या या व्यवहाराला एनसीडीईएक्स मान्यता देते.   
- भविष्यकालीन वायद्यावर शिक्कामोर्तब होते. प्रत्यक्षात माल दिल्यानंतर व्यवहार पूर्ण होतो. तत्पूर्वी बाजारभावातील तेजी-मंदीनुसार सौदा रद्द करण्याचा अधिकार दोघांना असतो.
- विक्रेता आणि खरेदीदार व्यवहार निश्चित करताना किंमत, मालाचे प्रमाण, माल देण्याची जागा इत्यादी ठरवून घेतात.   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...