आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कुरूपुत्र भीष्म हेच खरे मृत्युंजय\', राजपद त्यागून अखेरपर्यंत राज्यशकट चालवण्याचे विलक्षण कर्तृत्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - एका बाजूला बलाढ्य नियती आणि दुसऱ्या बाजूला कठोर प्रतिज्ञाबद्ध बलाढ्य भीष्म, यांचा संघर्ष महाभारतकाळाने अनुभवला. मृत्यू कुणालाच परवानगी विचारत नाही, पण मृत्यूलाही थोपवून धरण्याचे सामर्थ्य भीष्मांपाशी होते. हयातभर स्वत:च जोपासलेल्या आप्तस्वकीयांचा सर्वनाश स्थितप्रज्ञ बुद्धीने ज्यांनी सोसला आणि उदात्त मरण स्वीकारून, ज्यांनी नियतीशी अभूतपूर्व लढा दिला, त्या भीष्महृदयाची आगळी कहाणी औरंगाबादचे ज्येष्ठ लेखक, संशोधक डॉ. रामचंद्र मोरवंचीकर यांच्या लेखणीतून वाचकांसमोर येत आहे.   

डॉ. मोरवंचीकर लिखित ‘भीष्महृदय’ या  ग्रंथाचे प्रकाशन २० जून रोजी पुण्यात होणार आहे. ‘दिनमार्क पब्लिकेशन्स’तर्फे ही साहित्यकृती प्रकाशित होणार आहे. ज्येष्ठ मूर्ती शास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, हस्तलिखितांचे अभ्यासक व संग्राहक वा. ल. मंजूळ आणि प्रकाशक दिनकर शिलेदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.    
 
डॉ. मोरवंचीकर ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले, ‘भीष्म हा विषय अनेक वर्षांपासून माझ्या मनात होता. खरे तर भोवतालच्या सामाजिक वास्तवातही अनेक ‘भीष्म’ वावरताना दिसतात. अनेक प्रकारच्या प्रतिकूलतांशी ते जिद्दीने, परिश्रमपूर्वक, निर्धाराने आणि काही एक मूल्यभान  घेऊन लढत असतात. त्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात, तरीही अंतिमत: हे प्रयत्न अयशस्वी ठरताना दिसतात. भीष्मांबाबत  ही अपयशाची मालिका अखेरपर्यंत दिसते. त्यांच्या कुमारवयातील ‘भीष्मप्रतिज्ञे’पासून हे अपयश सुरू होते, ते ६० दिवस साक्षात मृत्यूलाही थोपवून धरण्यापर्यंत  कायम राहते, हे आपण महाभारतात वाचले आहे. अंतिम विजय नियतीचाच होणार असतो, हे माहिती असले तरी नियतीशी माणूस किती काळ संघर्ष करतो. भीष्म इथे मृत्यूच्या अधीन होऊनही खरा ‘मृत्युंजय’ ठरतो, अशी मांडणी केली आहे.’  
 
पुढील स्लाइडवर वाचा, भीष्मांसमोर काळ फिका...  
बातम्या आणखी आहेत...