आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देहतून तुकोबांच्या पालखीचे उत्साहात प्रस्थान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विठुरायाचा नामघोष करत संत तुकाराम महाराजांच्या पालखीने शुक्रवारी दुपारी देहू गावातील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. - Divya Marathi
विठुरायाचा नामघोष करत संत तुकाराम महाराजांच्या पालखीने शुक्रवारी दुपारी देहू गावातील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
पुणे - टाळ-मृदंगाच्या तालावर, विठोबा-रखुमाईच्या जयघोषात आणि पारंपरिक उत्साहात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने शुक्रवारी दुपारी देहूगावातील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. राज्यभरातून आलेले हजारो वारकरी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. सायंकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसाने पालखीवर जलाभिषेक केला. पावसाच्या वेगामुळे वारकऱ्यांची तारांबळ उडाली असली तरी प्रस्थान सोहळ्याच्या आनंदात भरच पडली.  
 
नियोजनाप्रमाणे ज्येष्ठ वद्य सप्तमीला निघणाऱ्या पालखीसाठी गुरुवारपासूनच वारकरी देहू गावात येऊ लागले होते. पहाटे नैमित्तिक धार्मिक विधी झाले. महाआरती झाल्यानंतर पालखीचे आगमन मंदिरात होताच वारकऱ्यांनी विठूनामाचा एकच गजर केला. “तुकाराम तुकाराम’च्या जयघोषात मंदिर प्रदक्षिणा करून महाद्वारातून पालखी बाहेर पडली.  
 
शुक्रवारी पहाटे पाचला श्रींची महापूजा व शिळामंदिरातील महापूजा झाली. त्यानंतर पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधीची पूजा करण्यात आली. दिलीप महाराज मोरे यांनी सकाळी नऊ वाजता इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांची पूजा केला. दहाच्या सुमारास संभाजी महाराज मोरे यांचे पालखी प्रस्थान सोहळा सप्ताह काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर प्रस्थानपूर्व पूजेसाठी पादुका मुख्य मंदिरात आणल्या गेल्या. दुपारी अडीचच्या सुमारास पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे शुक्रवारी रात्री मुख्य मंदिरापासून जवळच असलेल्या इनामदार वाड्यात पालखी पहिल्या मुक्कामासाठी विसावली. (शनिवारी) सकाळी देहूगावातून निघून पालखी पुणे-मुंबई महामार्गावरील देहू फाटा येथे दाखल होणार आहे.

पाचशे पोलिसांचा कडक बंदोबस्त  
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रस्थानापूर्वी देहूत पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पालखी सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. निगडी ते दापोडी परिसरात पाचशे पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. दंगल काबू नियंत्रक पथक, बॉम्बशोधक पथक तैनात आहे. वाहतूक व्यवस्थेतही बदल केल्याची सूत्रांनी दिली.  

आज ज्ञानोबांची पालखीचे प्रस्थान  
शनिवारी (ता. १७) आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम या दोन्ही पालख्या रविवारी पुण्यात मुक्कामी असणार आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा फोटो, व्हिडिओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...