आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण-तुलसी विवाह; विवाहाची पारंपरिक मिरवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राधे कृष्ण, गोपाल कृष्ण...चा जयघोष, ‘शुभमंगल सावधान...’चे स्वर कानी पडताच वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणाऱ्या पारंपरिक वेशातील महिला आणि डोक्यावर कृष्णाची मूर्ती व तुळशी-वृंदावन घेऊन काढलेली वरात... अशा थाटात पारंपरिक पद्धतीने तुलसी विवाह सोहळा पार पडला. एरवी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक असलेल्या वऱ्हाडी मंडळींनी बुधवारी   श्रीकृष्ण-तुलसी विवाह सोहळ्यानंतर देवाच्याच चरणी नतमस्तक होत, उत्तम आरोग्य व सुखी समाज याकरिता प्रार्थना केली.    

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मंडईतील साखरे महाराज मठ येथे आयोजित तुलसी विवाह सोहळ्याचे. या वेळी ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, राजाभाऊ घोडके, उल्हास भट, बाळासाहेब सातपुते, संगीता रासने यासह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झाला. चौकाचौकात मिरवणुकीचे स्वागत करत श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीत फुगड्या घालत फेर धरून महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रभात बँड आणि दरबार ब्रास बँडदेखील मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. रांगोळीच्या पायघड्यांनी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला होता. दरवर्षी गणेश मंदिरामध्ये महिनाभर सुरू असलेल्या काकड आरतीचा समारोप या विवाह सोहळ्याने होतो.    
बातम्या आणखी आहेत...