आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखीचे देहूतून हरिनाम घोषात प्रस्थान, अाज अाकुर्डीच्या दिशेने करणार कूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- विठ्ठलजळी, स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला.. या भावनेने विठ्ठलमय झालेल्या लक्षावधी वारकऱ्यांच्या मुखातून उठणारा हरिनामाचा घोष आणि भगव्या पताका मिरवत पंढरीच्या वाटेकडे निघण्यास अधीर झालेली पावले... अशा वातावरणात श्रीक्षेत्र देहू येथून सोमवारी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. परंपरेनुसार देहू येथील इनामदार वाड्यात तुकोबांची पालखी प्रस्थानानंतर विसावली. मंगळवारी तुकोबांचा पालखी सोहळा आकुर्डीच्या दिशेने वाटचाल सुरू करणार आहे.

तुकोबांच्या पालखीसोहळ्याचे यंदा ३३१ वे वर्ष आहे. पालखी सोहळ्यात साडेतीनशे दिंड्यांचा समावेश असल्याची माहिती विश्वस्त सोहळाप्रमुख अशोक मोरे यांनी दिली. सोमवारी पहाटे साडेतीनपासून देहूच्या मंदिरात विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला. प्रथम काकड आरती, घंटानाद, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती अशा क्रमाने विधी करण्यात आले. नऊपर्यंत भाविकांच्या महापूजा झाल्या. त्यानंतर सुरू झालेल्या दर्शनबारीमुळे वारकऱ्यांची एकच झुंबड उडाली. तसेच वीणामंडपात प्रवचन, कीर्तन सेवाही करण्यात आली. काल्याचे कीर्तन ऐकण्यासाठीही वारकऱ्यांची मोठी गर्दी होती.
आषाढी वारीसाठी राज्यभरातून लक्षावधी वारकऱ्यांचे देहू आणि आळंदी येथे आगमन झाले असून, साऱ्या वातावरणात ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’चे सूर घुमत आहेत. राज्यात पावसाचे आगमन झाल्याने वारकरी मंडळींच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.

पालखी सोहळ्याच्या प्रस्थानसमयी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, पाणीपुरवठामंत्री बबन लोणीकर, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, सदाभाऊ खोत, सुरेश गोरे, महेश लांडगे, देहूच्या सरपंच हेमा मोरे आदी उपस्थित होते. पालखीचे पौरोहित्य गिरीधर खुंटे आणि सुभाष साकमळे यांनी केले. ‘चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेसाठी निर्मल वारीअंतर्गत कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती या वेळी मुनगंटीवार यांनी दिली.

संतश्रेष्ठ तुकाेबांच्या पालखी साेहळ्यात सहभागी हाेण्यासाठी साेमवारी लाखाे वैष्णवांचा मेळा देहूनगरीत जमला हाेता. मुख्य मंदिरात तुकाेबांच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात अाले.
माउलींची पालखी अाज निघणार : आळंदीयेथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी दुपारी प्रस्थान होणार आहे. वारकऱ्यांचे जत्थे अलंकापुरीत दाखल झाले आहेत. ४७ दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात येईल. माउलींच्या प्रस्थान सोहळ्याच्या रथाची पुष्पसजावट आळंदी येथील नगर परिषदेचे नानासाहेब गरुड त्यांचे बंधू सुदीप प्रदीप गेल्या २८ वर्षांपासून विनाशुल्क करत आहेत.

वारीसोबत टपाल खातेही : यंदाप्रथमच वारीसोबत डाक विभागाचे वाहनही असेल. वारकऱ्यांना टपाल सोयी वारीदरम्यान मिळणार आहेत. वारकऱ्यांसाठी मनीऑर्डर देवाची आळंदी पोस्ट ऑफिसच्या नावे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. टपाल वाहन २८ जून ते १६ जुलै दरम्यान उपलब्ध असेल. वारकऱ्यांना ओळखपत्र दाखवून पेमेंट घेता येईल,असे सहायक पोस्ट मास्तर जनरल एफ. बी. सय्यद यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...