आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणमंत्र्यांना पुण्यातील संतप्त पालकांचा घेराव; भूमिका ऐकायला शिक्षणमंत्र्यांना वेळ नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- खासगी शाळांच्या शुल्कवाढीवर सरकारचे कुठलेही नियंत्रण नाही, भरमसाट शुल्क आकारणाऱ्या शाळांवर शिक्षण विभाग काहीही कारवाई करत नाही. यासंदर्भात पालक संघटनांची भूमिका ऐकायला शिक्षणमंत्री वेळ देत नाहीत, अशी तक्रार करत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना संतप्त पालकांनी बुधवारी घेराव घातला.   

भारती विद्यापीठातील कार्यक्रमासाठी शिक्षणमंत्री तावडे पुण्यात आले होते. खासगी शाळांच्या शुल्क वाढीसंदर्भात ओझरता उल्लेख तावडे यांनी करताच पालकांनी कार्यक्रमस्थळीच तावडे यांना घेराव घातला आणि त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. ‘शुल्क नियंत्रण कायदा २०११ मध्ये झाला. पण शिक्षण विभागाला एवढ्या वर्षांनी जाग येते, याला काय अर्थ आहे? पालकांच्या संघटना प्रतिनिधींना भेटायला शिक्षणमंत्री वेळ देत नाहीत, शुल्कवाढ सातत्याने केली जात असूनही शिक्षणमंत्री त्याकडे दुर्लक्ष करतात,’ अशा शब्दांत तक्रारी मांडत पालकांनी शिक्षणमंत्र्यांना भंडावून सोडले. गेली काही वर्षे सतत आम्ही याविरोधात संघर्ष करत आहोत, आंदोलने करत आहोत, खासगी शाळा शैक्षणिक साहित्य खरेदीसाठीही विद्यार्थी-पालकांवर सक्ती करत आहेत, तरीही शिक्षणमंत्री कुठलेही ठोस पाऊल उचलत नाहीत, आमच्या निवेदनांवर कुठलीही कारवाई आजवर झालेली नाही, केवळ पोकळ आश्वासने देता, अशा शब्दांत पालकांनी तावडे यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले.  
  
त्यावर ‘मी पालक संघटनांना भेटतो. मी एकावेळी किती निर्णय घेऊ शकणार, याला मर्यादा आहेत. मात्र, शाळा सुरू होण्यापूर्वी यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल,’ अशा गुळमुळीत शब्दांत तावडे यांनी घेरावमधून सुटका करून घेतली.
बातम्या आणखी आहेत...