आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील प्रवेशाशी आमचा काय संबंध, 12 वी फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांबाबत सर्वांचेच हात वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘पुरवणी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची जबाबदारी आमची कशी असेल? तो उच्च शिक्षण विभागाचा विषय आहे. शासन पातळीवर ते ठरेल’, असे राज्य बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे सांगत आहेत. तर दुसरीकडे ‘बारावीच्या आत्ता उत्तीर्ण झालेल्या मुलांशी आमचा काय संबंध?’ असा प्रतिप्रश्न पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी केला अाहे. त्यामुळे फेरपरीक्षेत उत्तीर्ण हाेऊनही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात अाहे.
बारावीच्या मुख्य परीक्षेच्या निकालानंतर लगेच एक महिन्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय विनोद तावडे यांनी घेतला हाेता. या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाऊ नये, असाच यामागे उद्देश हाेता. मात्र त्यांच्या पुढील प्रवेशाचे काय? याबाबत प्रश्न कायम हाेता. कारण फेरपरीक्षेचा निर्णय लागेपर्यंत पदवीच्या पहिल्या वर्षाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊन महाविद्यालये सुरूही झाली अाहेत. तंत्रशिक्षण व अन्य कौशल्याधारित वर्गही सुरू झाले अाहेत. मग ऑगस्टमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश कसे देणार? असा प्रश्न यापूर्वीही उपस्थित झाला हाेता. त्यावर ‘आम्ही प्रत्येक शिक्षणसंस्था, कौशल्याधारित शिक्षण देणाऱ्या संस्थांशी बोलून या प्रश्नावर मार्ग काढू’, असे उत्तर तावडे यांनी दिले हाेते. प्रत्यक्षात असे काहीच झाले नसून, फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राज्यभरातील ३२ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न मात्र कायम राहिला अाहे. यासंदर्भात उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ताे होऊ शकला नाही.
जबाबदारी अामची नाही
विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे, त्यांना गुणपत्रिका देणे हे आमचे काम आहे. त्यांचे प्रवेश कसे व्हावेत, कधी व्हावेत हे ठरवण्याचे काम उच्च शिक्षण विभागाचे. फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत शासन स्तरावर निर्णय अपेक्षित आहे, ती आमची जबाबदारी नाही.
गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत आमचा विभाग ठरवू शकत नाही. ते विद्यापीठ स्तरावर ठरेल. विद्यार्थ्यांना प्रवेश देणे किंवा त्या संदर्भात सर्व गोष्टी विद्यापीठ स्तरावर होतील याच्याशी आमच्या उच्च शिक्षण विभागाचा काय संबंध?
डॉ. विजय नारखेडे, उच्च शिक्षण विभाग, पुणे
बातम्या आणखी आहेत...